Ahamadnagar News :
अहमदनगर जिल्ह्यातील राहता बाजार समितीत एका डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला चांगला दर मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथिल डाळींब उत्पादक शेतकरी रमेश गाडेकर यांनी डाळिंब शेती केली आहे. सध्या त्यांनी डाळिंबाची काढणी सुरु केली असून त्यांनी त्यांचे डाळिंब विक्रीसाठी राहता बाजार समिती नेले असता त्यांना अपेक्षा पेक्षा जास्त दर मिळाला आहे. डाळींबाची व्हरायटी चांगली असल्यामुळे त्यांच्या २६ किलो डाळिंबाला ८०० रुपये किलोचा दर मिळाला असून डाळिंबाची पट्टी १६ हजार रुपये आली आहे.
राहता बाजार समितीत विविध जिल्ह्यातून डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंब घेऊन येत असतात. पुणे, छत्रपती संभाजीनगर ,नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून शेतकरी डाळींब विक्री घेऊन येतात. रमेश गाडेकर हे गेल्या तीन वर्षांपासून राहता बाजार समितीत डाळिंब विक्रीसाठी घेऊन जातात.
सोलापूर जिल्ह्यात देखील डाळिंबाचे चांगले उत्पादन घेतले जाते. पण पावसाअभावी शेतकरी आता डाळिंब बागा वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. त्यात तापमान वाढले आहे आणि पाण्याची समस्या आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागांना कापडी अच्छादन केले असून बागा वाचवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, पाऊस नसल्याने राज्यात आता उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे डाळिंबावर काळे डाग येण्याचा धोका वाढला आहे. शिवाय झाडांवर मर रोग येण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. त्यामुळे रोगापासून आणि वाढत्या तापमानापासून बागेचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी अच्छादन करुन बागा जपल्या आहेत.
Share your comments