गेल्या अनेक दशकांपासून राज्यातील शेतकरी बांधापर्यंत रस्ता हवा आहे म्हणून प्रतीक्षा करत आहेत. अनेक सरकारे आले आणि गेले मात्र शेतकऱ्यांची हे स्वप्न, स्वप्न म्हणूनच राहिले मात्र राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला मूर्तरूप देण्याचे ठरवले आहे. नुकत्याच चार महिन्यांपूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याच्या नावावरून महाविकास आघाडी सरकारने मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ता या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून राज्यातील तमाम शेतरस्त्यांची निर्मिती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला शेतरस्त्यांबाबतचा शेतकऱ्यांचा अति महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे चित्र यावेळी बघायला मिळत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यास अडचणी येतात, शेत रस्ते सुयोग्य स्थितीत नसल्यामुळे शेतमालाच्या वाहतुकी व्यतिरिक्त खतांची ने-आण करण्यासाठी मजुरांची ने-आण करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना नाकी नऊ येत असतात. राज्यातील अनेक भागात शेत रस्ते नसल्यामुळे उसासाठी पोषक वातावरण असताना तसेच पाण्याची मुबलक व्यवस्था असतानादेखील ऊस या नगदी पिकाची लागवड इच्छा असताना देखील शेतकरी बांधवांना करता येत नाही. शेतकऱ्यांच्या या हाल-अपेष्टा लक्षात घेता शेतरस्त्यांसंबंधित लवकरात लवकर टोकाचे पाऊल उचलले अनिवार्य होते. राज्यातील ठाकरे सरकारने मात्र आता शेतकऱ्यांच्या या हाल-अपेष्टाला जाणुन घेतले आहे आणि आता लवकरात लवकर राज्यातील सर्व शेतरस्ते मूर्त रूप घेण्याच्या तयारीत आहेत. मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद योजनेअंतर्गत शेतरस्ते बनवण्याचा पहिला मान मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याला देण्यात आला आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यातील 64 शेत रस्ते बनविले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत एक किलोमीटरच्या पानंद शेत रस्त्यासाठी सुमारे 24 लाख रुपयांचा निधी मंजूर झाले असल्याचे उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सांगितले.
तसं बघायला गेलं तर शेतीसाठी पानंद रस्ता असणे खूप महत्त्वाचे आहे यामुळे राज्यातील जवळपास सर्व शेतकरी मोठ्या अडचणीत असतो. शेत रस्ते नसल्याकारणाने इच्छा असताना देखीलशेतकरी बांधवांना शेती क्षेत्रात उंच भरारी घेता येत नाही. शेत रस्ते नसल्याने शेतकरी बांधवांना शेतमाल विक्रीला घेऊन जाण्यासाठी डोईवर ताण द्यावा लागतो. शेत रस्ते नसल्याने सर्वात जास्त अडचण पावसाळ्यात शेतकरी बांधवांना भासत असते, पावसाळ्यात शेतकामाची लगबग सुरू असतानाच शेत रस्ते नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नानाविध अडचणींना तोंड द्यावे लागते. रस्त्यांमुळे सर्वात मोठी अडचण वाहतुकीसाठी होत असते यामुळे वेळेत शेतमाल विक्री देखील केला जाऊ शकत नाही त्यामुळे शेतकर्यांची आर्थिक कोंडी बघायला मिळते. आता मात्र राज्यातील शेतकऱ्यांना निदान रस्त्यांबाबत तरी अच्छे दिन येणार असल्याचे चित्र नजरेस पडत आहे. मातोश्री ग्राम समृद्ध पानंद रस्ता योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे 64 शेत रस्ते निर्माण केले जाणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकरी मोकळा श्वास घेतील एवढे नक्की.
जिल्ह्यातील सात तालुक्यात ठाकरे सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेद्वारे शेत रस्ते तयार केले जाणार आहेत. या सात तालुक्यात कळंब, उमरगा, तुळजापूर, भूम, उस्मानाबाद, लोहारा, वाशी याच तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यात शेत रस्ते निर्मिती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याने शेत रस्ते मोकळे करण्याची जणू मोहीमच छेडली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील शेत रस्ते लवकरच मूर्तरूप घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. आधी एक किलोमीटर क्षेत्रास त्यासाठी फक्त पाच लाख रुपये एवढी तुटपुंजी राशी दिली जात होती मात्र आता या योजनेअंतर्गत एका किलोमीटरसाठी सुमारे 24 लाख रुपये मिळणार असल्याने दर्जेदार शेत रस्त्यांची निर्मिती होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Share your comments