कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात कांद्यावर मोठे संकट बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील कांदा एक मुख्य पीक आहे. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन घेतले जाते खरीपाप्रमाणेच रब्बी हंगामात देखील उन्हाळी कांद्याची मोठी लागवड जिल्ह्यात बघायला मिळते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कांदा पिकावर अवलंबून असते. मात्र या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते, खरिपात जास्तीच्या पावसामुळे नुकसान झाले तर आता रब्बीतील उन्हाळी कांद्याचे पावसाच्या कमतरतेमुळे मोठे नुकसान होत आहे. फेब्रुवारीच्या मध्यावरच जिल्ह्यातील अनेक भागात विहिरी जणूकाही कोरड्या होऊ लागल्या आहेत त्यामुळे जिल्ह्याचे मुख्य पीक मोठ्या संकटात सापडले असल्याचे सांगितले जात आहे.
तसं बघायला गेलं तर यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे, मात्र हा सरासरीपेक्षा अधिक पाऊस सातत्याने पडला नाही. त्यामुळे विहिरीला अपेक्षित असे पाणी उतरले नसल्याचे शेतकऱ्यांद्वारे सांगितले जात आहे. त्यामुळे फक्त एक महिना अगोदर ज्या जिल्ह्यात पावसामुळे कांद्याचे पीक वाफ्यातच सडत होते त्या जिल्ह्यात एक महिन्यानंतर पावसाच्या कमतरतेमुळे कांदा अक्षरशः वाफ्यातच करपत आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त पाणीटंचाईची समस्या येवला या दुष्काळग्रस्त तालुक्यात बघायला मिळत आहे. तालुक्याचा पूर्व भाग सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करताना बघायला मिळत आहे. तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या विकत पाणी घेऊन कांदा पीक जोपासण्याची नामुष्की ओढावली आहे. तालुक्यातील राजापूर परिसरात कांदा उत्पादक शेतकरी सध्या विकत पाण्याचे टँकर घेऊन कांदा पिकास पाणी देत आहेत. एकीकडे कांदा पिकासाठी पोषक वातावरण त्यामुळे उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड तर दुसरीकडे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील विहिरींनी तळ गाठला असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विकतचे पाणी घेऊन कांद्याची जोपासना करावी लागत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चात मोठी वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.
खरं पाहता येवला एक दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली होती, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात कांदा पिकासाठी पाणी पुरेल अशी आशा होती. मात्र तालुक्याच्या पूर्व भागात फेब्रुवारीच्या मध्यावरच विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे हे अनपेक्षित संकट समोर उभे राहिले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील विशेषता राजापूर ममदापुर देवदरी व परिसरात विहिरी जणूकाही कोरड्या झाल्या आहेत विहीर कोरडी झाल्यावर पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकत नाही ते शेतकऱ्यांना देखील चांगल्यापैकी ठाऊक आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आता विकत पाणी घेऊन विहिरीत साठा करण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील शेतकरी 25 हजार लिटरचा टॅंकर जवळपास तीन हजार रुपये दराने विकत घेऊन उन्हाळी हंगामातील कांदा पीक जोपासत आहेत. कांदा पिकाबरोबरच जनावरांना देखील पिण्यासाठी पाण्याची कमतरता परिसरात बघायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी बांधव मुक्या प्राण्यांची देखील विकतच्या पाण्याने तहान भागवीत आहेत.
परिसरातील शेतकरी दुष्काळग्रस्त भाग असून देखील उत्पन्नवाढीचे अनुषंगाने मोठ्या प्रमाणात उन्हाळी हंगामात कांद्याची लागवड करत असतात. या पावसाळ्यात अधिकचा पाऊस झाला असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात पाणी पुरेल अशी आशा होती, त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. मात्र आता फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने शेतकरी बांधवांना अधिक उत्पादन खर्च करून कांद्याची जोपासना करावी लागत आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने केलेला हा शेतकऱ्यांचा धाडसी प्रयोग यशस्वी होतो की नाही हे सर्वकाही कांद्याच्या भविष्यातील दरावरच अवलंबून असेल.
Share your comments