राज्यात अनेक ठिकाणी लाल कांद्याची काढणी सुरू आहे, नाशिक जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची काढणी शेतकरी बांधव करताना दिसत आहेत.जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा अर्थात कसमादे पट्ट्यात लाल कांदा काढण्याच्या कामाला कमालीची गती प्राप्त झाली आहे. परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा विक्रीसाठी लगबग देखील यावेळी नजरेस पडत आहे. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून विख्यात असलेले लासलगाव बाजारपेठ समवेत जिल्ह्यातील अनेक मोठ्या मोठ्या बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक बघायला मिळत आहे.
लासलगाव बाजार समितीत तसेच जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी पिंपळगाव बाजार समितीमध्ये देखील कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक यावेळी नजरेस पडली. संपूर्ण आठवडाभर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. परंतु असे असले तरी कांद्याच्या बाजार भावावर आवक वाढल्याचा परिणाम दिसून आला नाही. कांद्याचे बाजार भाव हे संपूर्ण आठवडाभर स्थिरच राहिले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळाल्याचे चित्र समोर येत आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रमुख बाजारपेठेत कांद्याला सर्व साधारण दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर प्राप्त झाला, तसेच कमाल भाव हा 2500 रुपयाच्या आसपास संपूर्ण आठवाड्याभर कायम राहिला. जाणकार व्यक्तींच्या मते, प्रमुख कांदा उत्पादक राज्य म्हणून गणले जाणारे गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात यंदा कांदा काढणीसाठी उशीर झाला असल्याने राज्यातील कांद्याला विशेषता जिल्ह्यातील कांद्याला मोठी मागणी आहे आणि त्यामुळेच कांद्याला चांगला बाजारभाव प्राप्त होत आहे.
संपूर्ण राज्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने परत त्राहिमाम् माजवला होता आणि याचा सर्वात जास्त फटका कांदा पिकाला बसल्याचे सांगितले जात आहे. आणि यामुळे कांद्याच्या उत्पादनात कमालीची घट घडून आल्याचे जाणकार लोक मत व्यक्त करत आहेत. 15 जानेवारीला म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत वीस हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याचे सांगितले जात आहे. बाजार समितीत या दिवशी तब्बल 1345 वाहनानी हजेरी लावल्याचे देखील समोर येत आहे.
Share your comments