नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बऱ्याचअंशी कांदा पिकावर अवलंबून असतात. जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा म्हणजे "कसमादे" परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा लागवड करतात. हा कसमादे पट्टा कांदा लागवडीसाठी विशेष ओळखला जातो. सध्या कसमादे परिसरात शेतकऱ्यांची उन्हाळी कांदा लागवड करण्यासाठी लगबग सुरु आहे, असे असले तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात ढगाळ वातावरणामुळे विचाराचे काहूर माजले आहे. आधीच खरीप हंगामाच्या लाल कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच उन्हाळी कांदाच्या रोपवाटिका देखील अवकाळी मुळे बऱ्याचअंशी खराब झाल्या आहेत.
अवकाळी मुळे खरीप हंगामातील कांद्याच्या उत्पादनात घट झाल्याचे सांगितले जात आहे. आता कसमादे परिसरातील शेतकरी खरीप हंगामातील नुकसान कसेबसे विसरून उन्हाळी कांदा लागवड करीत आहेत आणि शेतकऱ्यांना यातून चांगल्या उत्पादनाची आशा आहे. मात्र असं असतानाच राज्यातील इतर जिल्ह्यात अवकाळीने दस्तक दिली आहे. आणि इतर राज्यातील पावसाचे पडसाद कसमादे परिसरात उमटताना दिसत आहेत, यामुळे कसमादे परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. आणि म्हणुन परिसरातले कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. साधारणतः ह्या दिवसात पाउस पडला तर गारपीट होण्याची जास्त शक्यता असते. सोमवारी परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण तयार झाले आहे.
जर आता पाऊस आला तर लागवड केलेला कांदा खराब होईल आणि परत दुबार कांदा लागवड करणे शक्य होणार नाही यामुळे शेतकऱ्यांचे हजारोचे नुकसान होईल शिवाय केलेली मेहनत देखील मातीमोल होणार म्हणुन या भागातील शेतकरी अवकाळी पाऊस येऊ नये म्हणुन देवाकडे साकडं घालताना दिसत आहेत. अद्याप अवकाळी पावसाने हजेरी लावलेली नाही मात्र तयार झालेल्या पावसाच्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर अनेक रोग चाल करुन आले आहेत. परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी ह्या रोगांचा नायनाट करण्यासाठी महागडी औषधे फवारताना दिसत आहेत.
फक्त पावसाचे वातावरण तयार झाले आहे तरी कांदा पिकावर रोगाचे सावट नजरे पडत आहे जर अवकाळीने हजेरी लावली तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. आधीच खरीप हंगामातील लाल कांद्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे आणि आता जर पुन्हा अवकाळी बरसला तर उन्हाळी कांदा पिकातून देखील शेतकऱ्यांना उत्पादन पदरी पडणार नाही अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. म्हणुन जिल्ह्यातील विशेषता कसमादे पट्ट्यातील शेतकरी अवकाळी नको रे बाबा…….. असे म्हणताना दिसत आहेत.
Share your comments