या वर्षी राज्यामध्ये अतिवृष्टीने खरीप हंगामाचे अतोनात नुकसान केले. कापूस आणि सोयाबीन सारखी प्रमुख पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. हे संकट बाजूला सारून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली असून ती आता अंतिम टप्प्यात आली आहे.
मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये खरिपात सोयाबीन या पिकाची लागवड करण्यात येते आणि रब्बी हंगामामध्ये हरभरा आणि गहू ही मराठवाड्यातील दोन पिके महत्वाचे आहेत. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचा विचार केला तर रब्बी हंगामात आतापर्यंत 1 लाख 72 हजार क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या क्षेत्रापैकी हरभरा हे पिक 1 लाख 47 हजार हेक्टरवर आहे. तर उर्वरित सर्व पिकेही 25 हजार हेक्टरवर आहेत. मराठवाड्यामध्ये रब्बी हंगामातील मुख्य पिके करडई होते. परंतु कालांतराने उत्पादनाच्या दृष्टीने काही बदल झाल्याने हरभऱ्याचे क्षेत्रात वाढ झाली आहे.
करडई या पिकाबद्दल शेतकऱ्यांमध्ये हवी तेवढी जनजागृती नाही.तसेच यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सिंचनाचा प्रश्न मिटलेला आहे. तसेच रब्बी हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच कृषी विभागाने हरभरा पिकाचे उत्पादन घेण्याचे आव्हान केले होते. त्यामुळे रब्बी हंगामात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हरभरा पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झालेली आहे.हरभरा हे पीक कमी पाण्यात आणि कमी वेळेत हातात पडणारे पीक आहे.
या वर्षी पावसामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत शेतजमिनी ह्या ओलसर होत्या. त्यामुळे या क्षेत्रावर ज्वारी पेक्षा हरभऱ्याची पेरणी केली तर उत्पादनात वाढ होईल अशा प्रकारचा सल्ला कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला होता. तसेच हरभऱ्याचे बियाणे अनुदानावर कृषी विभागाने उपलब्ध करून दिल्यामुळे त्याचा परिणाम आता पेरणीच्या दरम्यान दिसून येत आहे. कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी पुसा 256, पंत जी 114,केडब्ल्यूआर 108 इत्यादी सुधारित बियाण्यांचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे.
Share your comments