संपूर्ण भारतवर्षात जैविक शेतीला प्रोत्साहित करण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. शासन दरबारी जैविक शेतीला चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना देखील आखल्या जात आहेत. असे असले तरी शेतकरी राजा मात्र उत्पादनवाढीच्या आशेने रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर करतच आहे. देशात सर्वत्र रासायनिक खतांचा भरमसाठ वापर केला जातो, मात्र रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर करण्यात महाराष्ट्र राज्य शीर्षस्थानी विराजमान झाला आहे. मागच्या पाच वर्षात रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर महाराष्ट्र राज्यात 35 टक्क्यांनी घसघशीत वाढला आहे.
यासंदर्भात एक पाहणी केली गेली असता या पाहणीत ही बाब समोर आली आहे. एकीकडे रासायनिक खतांच्या वापरात वाढ होत आहे तर दुसरीकडे मानवी आरोग्यासाठी तसेच जमिनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या सेंद्रिय अथवा जैविक खतांचा वापर नगण्यच नजरेस पडत आहे. सध्या राज्यात फक्त दहा टक्के सेंद्रिय अथवा जैविक खतांचा वापर होत आहे. रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर केल्याने मानवी शरीराला तसेच जमिनीच्या आरोग्याला देखील धोका पोहोचत असतो ही बाब शेतकरी राजाला भलीभाती ठाऊक असताना देखील रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर सुरूच आहे, आणि सहाजिकच ही बाब शेतकऱ्यांसाठी व सामान्य नागरिकांसाठी एक चिंतेचा विषय ठरत आहे. रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर केल्याने शेतजमिनीचा पोत कमालीचा ढासळत असतो शिवाय यामुळे जमिनीतील पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सूक्ष्मजीव आणि मित्र कीटक देखील मारले जातात, आणि याचा परिणाम सरळ उत्पादनावर होताना दिसत आहे.
म्हणजे शेतकरी बांधवांनी उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर केला मात्र यातून उत्पादन वाढणे ऐवजी उत्पादनात घट होताना दिसत आहे आणि यासोबतच शेतजमिनीचा कस देखील कमी होत आहे. रासायनिक खतामुळे पशुपक्षी तसेच पाण्यात राहणारे जलचर यांच्यावर विपरीत परिणाम घडून येत आहे. परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की, काही दुर्मिळ प्रजाती रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापर यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकंदरीत या तयार झालेल्या एकत्रित समीकरणामुळे जैवविविधता कमालीची धोक्यात आली आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर टाळणे व सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे ही काळाची गरज बनली आहे.
सेंद्रिय खतांचा वापर केल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते शिवाय यामुळे उत्पादन देखील हळूहळू का होईना पण शंभर टक्के वाढण्याचे आसार असतात. म्हणून काळ्या आईचे आरोग्य सुधारण्यासाठी, बळीराजाला पुनश्च एकदा राजा बनवण्यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज बनली आहे. मात्र, बळीराजा या गोष्टींवर केव्हा गांभीर्याने विचार करेल त्यावरच देशातील सेंद्रिय शेतीचे भविष्य अवलंबुन आहे.
Share your comments