1. बातम्या

मध्यप्रदेश, राजस्थान अन् दिल्लीत औरंगाबादच्या टोमॅटोला जोरदार भाव

KJ Staff
KJ Staff


काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.  म्हणजे जणू काही एक टोमॅटो उत्पादक पट्टाच विकसित झालेला आहे. या पट्ट्यात उत्पादित झालेला टोमॅटो हा अतिशय उत्तम दर्जाच्या असल्याकारणाने औरंगाबाद जिल्ह्यातून मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थानमध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त टोमॅटो विक्रीसाठी पाठवण्यात येत आहेत.

त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात मार्केट उपलब्ध झाल्याने दरवर्षी शेतकऱ्यांचा कल हा टोमॅटो लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. कोरोना संकटामुळे पुकारलेला लॉकडाऊन आणि यावर्षी झालेली अतिवृष्टी खास करून मराठवाड्यात अतिशय जास्त प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोचे उत्पादन घेण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला.  सुरुवातीच्या काळामध्ये लागवडीच्या वेळेस पाऊस चांगला झाल्याने लागवड वेळेवर झाली. मात्र नंतरच्या काळामध्ये अतिशय पाऊस झाल्याने टोमॅटो मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला फार मोठ्या प्रमाणात फटका बसला.

या सगळ्या अडचणींवर मात करत औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन करून टोमॅटो विक्रीसाठी मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश या ठिकाणी दरदिवशी ३० टन तसेच औरंगाबाद तालुक्यातील पळशी शहर, बंकापूर, शामवाडी, पळशी तांडा अशा इतर परिसरातील गावांमधून जवळ-जवळ ३० टन टोमॅटो मध्यप्रदेशातील भोपाळ, जबलपूर येथील मार्केटमध्ये विक्रीला जात आहे.या मार्केटमध्ये टोमॅटोला चांगला दर मिळत आहे. जवळ-जवळ २५ किलोचा एक कॅरेट ५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीला विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असताना दिसून येत आहे. यावर्षी विक्रमी भाव ११०० रुपये प्रति कॅरेट होता.  त्या परिसरात यावर्षी २०० ते २५० शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. शेतकऱ्यांना गावातील गाडी मालकांकडून टोमॅटो भरण्यासाठी कॅरेटचा पुरवठा केला जातो.

विशेष म्हणजे गाडी मालक स्वतः शेतकऱ्यांच्या बांधाला जाऊन कॅरेट स्वतः गाडीत भरून थेट जबल्पुर, भोपाल इत्यादी ठिकाणी विक्रीला नेतात. तसेच स्थानिक मार्केटचा विचार केला तर औरंगाबाद शहरातही दररोज १०० पेक्षा जास्त कॅरेट टोमॅटो विक्रीला येत आहेत. औरंगाबाद तालुक्यातील वरुड काजी, वडखा, वरझडी, करमाड अशा परिसरातून जवळपास बावीस टनपेक्षा जास्त टॉमॅटो दिल्ली, जयपूर येथे विक्रीला जात जात आहेत. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच उप बाजार पेठ असलेले करमाळ या बाजारपेठेत टोमॅटो एकत्र करून व्यापारी ते विक्रीला नेतात. औरंगाबाद जिल्ह्यात आता वर्षभर उत्पादन टोमॅटो होणार आहे.  वर्षाच्या तिनही हंगामात म्हणजेच जून-जुलै, सप्टेंबर ऑक्टोबर, जानेवारी फेब्रुवारी या तीनही हंगामात लागवड केली जाते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters