या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने वाढीव दराने मदत देण्याचे जाहीर केले.
शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी दोन हजार आठशे कोटी रुपये दिले. परंतु यामध्ये जळगाव जिल्ह्याला एक रुपया सुद्धा भरपाई मिळालेली नाही. जळगाव जिल्ह्यात कमीत कमी पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. याबाबतीत शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
या अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवरील पिके पूर्णतः पाण्यात बुडाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत आहेत. या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना वाढीव दर आणि मदत करावी अशी मागणी लावून धरली.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात मागणी केली होती. त्यानंतर शासनाने एनडीआरएफच्या निकषांपेक्षावाढीव दरानेमदत जाहीर करून शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. परंतु अनुदान वितरित करण्याबाबत जाहीर केलेले शासन निर्णयात मात्र जळगाव जिल्ह्याचे यादीत नावच नाही.(संदर्भ-सकाळ)
Share your comments