राज्यात खरीप हंगामात मुख्य पिकांचे नुकसान झाले म्हणून नुकसान भरपाई काढण्यासाठी तसेच हात खर्चाला थोडेफार पैसे राहतील या हेतूने शेतकरी बांधवांनी भाजीपाला पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली. जालना जिल्ह्यातही उत्पन्न वाढीचे अनुषंगाने व खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची थोडीफार भरपाई काढण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबीर पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेकडो शेतकर्यांनी कोथिंबिरीची लागवड केली. मात्र शेतकऱ्यांनी केलेल्या या प्रयत्नाला बाजारपेठेची जोड मिळत नसल्याने शेतकरी राजा भरला जात असल्याचे चित्र जालना जिल्ह्यात बघायला मिळत आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात लावलेल्या कोथिंबीर पिकाला सध्या तीन रुपये प्रति किलो दराने मागणी होत असल्याने कोथिंबिरीला फुलोर आल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. कोथिंबीर लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या मते, जर या कवडीमोल दरात कोथिंबिरीची विक्री केली तर विक्रीसाठी नेण्याचा खर्च देखील वसूल होऊ शकत नाही त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर कोथिंबीर पीक तसेच सोडावे लागण्याची नामुष्की ओढावली आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मराठवाड्यातील जालना जिल्हा भाजीपाला उत्पादनासाठी राज्यात ख्यातीप्राप्त आहे. जिल्ह्यात उत्पादित केला जाणारा भाजीपाला संपूर्ण देशातील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जातो. अनेक शेतकरी भाजीपाला लागवडीतून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवीत असतात. जिल्ह्यात प्रामुख्याने बटाटे टमाटे आणि कोथिंबीरची लागवड लक्षणीय बघायला मिळते.
जालना जिल्ह्यातील शेतकरी विष्णु प्रभाकर पाडाळे हे देखील नेहमी भाजीपाला पिकाची लागवड करीत असतात. या रब्बी हंगामात त्यांनी खरीप हंगामाच्या मुख्य पिकांना फटका बसला म्हणून कोथिंबीर पिकाची लागवड करण्याचे ठरवले, त्या अनुषंगाने त्यांनी एक एकर क्षेत्रात कोथिंबिरीची लागवड केली सध्या ही कोथिंबीर उत्पादनासाठी सज्ज झाली आहे. मात्र बाजारपेठेत कोथिंबिरीला फक्त तीन रुपये किलो एवढा कवडीमोल दर प्राप्त होत असल्याने या शेतकऱ्याने आपल्या एक एकरावरील कोथिंबीर पिकावर पाणी सोडले आहे.
विष्णू यांनी सांगितले की, कोथिंबीर लागवड करण्यासाठी त्यांना सुमारे 20 हजार रुपयांचा खर्च आला आहे, त्यामुळे सध्या बाजारपेठेतील चित्र बघता कोथिंबीर लागवडीसाठी आलेला हा एवढा खर्च देखील काढणे मुश्कील होऊन आहे. तज्ञांच्या मते, जालना जिल्ह्यात समवेतच संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात कोथिंबिरीची आवक होत असल्याने कोथिंबीरला कवडीमोल दर प्राप्त होत आहे. एकंदरीत जिल्ह्यात बाजारपेठेतील चित्र बघता शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी ही अटळ असल्याचे समजत आहे.
Share your comments