शहरात शेतातून आणलेल्या भाजीपाला पिकांना व फळांना मोठी मागणी असते, शहरातील नागरिक शेतातून आणलेल्या ताज्या भाजीपाल्यासाठी चांगली मोठी रक्कम देखील मोजतात. याच गोष्टीचा फायदा सध्या काही भुरटे दलाल उचलताना नजरेस पडले आहे. बदलापूर शहरात थेट शेतकऱ्यांच्या वावरातून भाजीपाला आणलेला आहे असे सांगून शहरी नागरिकांना गंडवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बदलापूर शहरात काही विक्रेते व दलाल थेट शेतकऱ्यांच्या वावरातून कांदा आणलेला आहे असे सांगून तडका कांदा शहरातील नागरिकांना विक्री करत होते व त्यातून चांगली फसवणूक नागरिकांची करत होते.
बदलापूर शहरात अनेक दिवसापासून काही विक्रेते नासका कांदा उन्हात वाळवून तो थेट शेतकऱ्यांच्या वावरातून आणलाय असे खोटे नाटे ग्राहकांना पटवून मोठ्या चढ्या दरावर त्याची विक्री करत होते. हा शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी सर्रास चालवलेला एक खेळ आहे त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
बदलापूर कर्जत कडे गेल्यास तिथे एमआयडीसी एरियात एक सीएनजी पंप लागतो,यालाच लागून एक मोठे पटांगण आहे. या मोकळ्या पटांगणात हा काळाबाजार सर्रासपणे चालू आहे. रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या या पटांगणात मोठ्या प्रमाणात नासका कांदा वाळवण्यासाठी ठेवलेला असतो. हा कांदा पूर्णतः नासका असतो या कांद्याला मस्त वाळून त्याची साल काढून परत तो विक्रीसाठी नेला जातो. यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे असे सांगितले जात आहे. हा खेळ कुठे गुप्त ठिकाणी नाही तर मोकळ्या पटांगणात चालू आहे आणि शिवाय या कामासाठी आठ माणसे सुद्धा ठेवली गेली आहेत.
यामुळे बदलापूर वासियांना मोठा धोका होऊ शकतो, त्यामुळे कांदा विकत घेताना तो तपासून घेणे गरजेचे आहे. अनेक व्यापारी शेतकऱ्यांचा माल म्हणून आपल्याकडून एक्सट्रा पैसे गंडवतात, त्यामुळे भाजीपाला खरेदी करताना त्याची क्वालिटी ती आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी बघून घ्यावी, विकणाऱ्याच्या बोलणाऱ्यावर विश्वास न ठेवता तपासून खरेदी करावी. बदलापूर शहरात शेतकऱ्यांच्या नावावर हा अवैध धंदा चालू आहे त्यामुळे येथील नागरिकांनी प्रशासनाकडे यात जातीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
Share your comments