मुंबई: यावर्षी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष भासणार आहे व आतापासून महाराष्ट्राच्या अनेक भागात त्याची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कमी पाण्यात देखील उत्पादन वृध्दी करण्याकडे लक्ष दिले पाहीजे. आगामी काळात हवामान बदलामुळे शेतकरी बांधवांना अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे मात्र त्यांनी नाउमेद न होता आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक डॉ. पी. जी. पाटील यांनी केले. आयसीएआर अंतर्गत कपास प्रौद्योगिक मध्यवर्ती संस्थेच्या माटूंगा मुंबई येथील हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने राज्यस्तरीय कृषी फलोत्पादन सिंचन, दुग्धविकास व पशुसंवर्धन परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.
कापसातून अत्यंत सुबक कपडे निर्मितीकडे आमच्या संस्थेने लक्ष केंद्रीत केल्याचे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात यावर्षी महाराष्ट्रात 70 टक्के सरासरी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे आंब्या बरोबरच अन्य फळ फळावळ, भाजीपाला, फलोत्पादन यांचे उत्पादन घटणार आहे. महत्वाचे म्हणजे कोकणात ऑगस्ट, सप्टेंबर, कोरडा गेल्यामुळे भात उत्पादनावर देखील विपरीत परिणाम झाला आहे. मावळ, लोणावळा व राज्यातील अन्य भागात ग्रीन हाऊसच्या माध्यमाने गुलाब, जरबेरा, ऑर्कीड या फुलांचे मोठे उत्पादन होते. मात्र येथील उत्पादन ऑस्ट्रेलिया व न्युझिलंडने थांबविले आहे. अशाप्रकारे शेतकरी बांधव अडचणीत सापडला आहे. त्यांच्या समस्या शासन व सर्वसंबंधित यंत्रणांकडे आपण मांडणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीसाठी एपीएमसीला रिटेल व अन्य माध्यमाने पर्याय दिला जाईल असे सांगितले.
कार्यक्रमास उपस्थित कोकण कृषी विद्यापीठाचे असोसिएट डिन डॉ. यु. व्ही. महाडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात जी.आय चा कोकणातील हापूस उत्पादकांना चांगला फायदा होईल असे सांगून शेतकरी बांधवांनी मॅंगोनेट, व्हेजनेट, अनारनेट प्रणालीत आपल्या बागांची नोंदणी करुन निर्यातक्षम उत्पादन घेण्यावर भर द्यावा व आवश्यक त्याठिकाणी शेतकरी बांधवांनी विद्यापीठांच्या संशोधनाचा लाभ घ्यावा असे यावेळी आपल्या मार्गदर्षनात सांगितले.
परिषदेस गोदरेज अॅग्रोवेट लि. चे संचालक बुरजीस गोदरेज यांनी आपल्या मार्गदर्शनात कृषी फलोत्पादन दुग्धविकास व पशुसंवर्धन व्यवसायाला हातभार लावण्यासाठी गोदरेज अॅग्रोवेट कंपनीच्या वतीने अनेक चांगली उत्पादने निर्मितीवर आमचा भर असल्याचे यावेळी सांगितले. मुंबई स्टॉक एक्सचेंजचे (बीएसई) व्यवसाय वृध्दी व व्यापार विभागाचे प्रमुख समीर पाटील यांनी बीएसई च्या सहाय्याने व्यापार वृध्दिसाठी अनेक हितकारक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. निपॉन पेंट इंडियाचे अध्यक्ष हरदेवसिंह एस.बी. यांनी जपानच्या प्रथितयश कंपनीचा हा निपॉन पेंट (इंडिया) लि. हा प्रकल्प असून तो चेन्नईला जाणार होता मात्र महाराष्ट्राची सामाजिक बांधिलकी जपून आपण हा प्रकल्प राज्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
यावेळी कृषी फलोत्पादन दुग्धविकास पशुसंवर्धन क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य केलेल्या गोदरेज अॅग्रोवेट लि., युपीएल लि., जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. एस्सार अॅग्राटेक लि., व्हॅनसुम इंडस्ट्रीज लि., आदी उद्योग समुहांना तसेच आयसीएआर अंतर्गत कपास प्रौद्योगिक मध्यवर्ती संस्था, भारतीय कृर्षी अनुसंधान परिषद, माटुंगा मुंबई आदींना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. परिषदेत प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, आयात निर्यात, शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत (एफपीओ) शेतीचा विकास आदी विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. परिषदेस राज्यातील सर्व प्रकारच्या क्रॉप्सचे उत्पादन घेणारे शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
Share your comments