वांगी या पिकाची लागवड वर्षभर सर्व हंगामात खरीप, रब्बी आणि उन्हाळयातही करता येते. सर्वसाधारणपणे वांग्याची लागवड कोरडवाहू जमिनीवर आणि मिश्रपीक म्हणून करतात. आहारात वांग्याचा भाजी, भरीत, वांग्याची भजी, इत्यादी अनेक प्रकारे उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्या रोग्यांना गुणकारी असतात. वांग्यामध्ये खनिजे अ ब क ही जीवनसत्वे तसेच लोह, प्रथीने यांचे प्रमाण पुरेसे असते.वांगी हे पीक सर्वप्रकारच्या जमिनीमध्ये येऊ शकते.
काळी भारी जमीन शक्यतो वांगी पिकाच्या लागवडीसाठी वापरू नये. खरीप हंगामासाठी बियांची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवडयात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्ट मध्ये केली जाते. रब्बी किंवा हिवाळी हंगामासाठी बियांची पेरणी सप्टेंबर अखेर करतात आणि रोपे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये लावण्यात येतात. तसेच खाली दिलेल्या सुधारित जातींपासून वांग्याची लागवड करून शेतकरी अधिक उत्पन्न मिळवू शकतात.
सुधारित जाती -
मांजरी गोटा -
महाराष्ट्रात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या जातीचे झाड बुटके आणि पसरट असते. पाने आणि फळांच्या देठावर काटे असतात. फळांचा रंग जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पट्टे असतात. फळे चवीला रुचकर असून काढणीनंतर ४ ते ५ दिवस टिकतात. पिकाचा कालावधी १५० -१७० दिवसांचा असतो.
वैशाली -
वांग्याच्या या वाणाचे झाड बुटके आणि पसरट असून, फुले आणि फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून फळांचा रंग आकर्षक जांभळा असून फळांवर पांढरे पट्टे असतात. फळे झुबक्यात येतात. वैशाली या जातीच्या फळांची गुणवत्ता साधारण असली तरी भरघोस उत्पादन आणि लवकर येणारी असल्यामुळे शेतकरी याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात.
अरूणा -
या जातीची झाडे मध्यम उंचीची असून फळे भरपूर आणि झुबक्यात लागतात. फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून त्यांचा रंग चमकदार जांभळा असतो. हेक्टरी सरासरी उत्पादन 300 ते 350 क्विंटल वांग्याच्या वरील जाती शिवाय कृष्णा एम एच बी 10 या अधिक उत्पादन देणा-या संकरीत जाती आहेत.
अनुराधा -
अनुराधा ही वांग्याची जात मांजरीगोटा व पुसा पर्पल क्लस्टर यांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. गोल, काटेरी, आकर्षक रंगाची लहान फळे असणारा हा वाण पर्णगुच्छ व शेंडे अळीला कमी प्रमाणत बळी पडतो.
प्रगती -
या जातीचे झाड उंच असून पाने गडद हिरव्या रंगाची असतात. पाने फळे आणि फांदयावर काटे असतात. या जातीचे फूले आणि फळे झुबक्यांनी येतात. फळे अंडाकृती आकाराची असून फळांच्या रंग आकर्षक जांभळा असून पांढ-या रंगाचे पटटे असतात. पिकांच्या कालावधी 175 दिवस असून 12 ते 15 तोडे मिळतात. हेक्टरी सरासरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल येते.
Share your comments