१) २६ ऑक्टोबरला नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता
राज्य सरकारने सुरु केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता २६ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. याचबरोबर मोदी सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीचा १५ वा हप्ता दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी सणाला काहीसा आधार मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसानच्या लाभार्थ्यांना ६ हजार रुपयांचा लाभ दिला जातो. त्याचबरोबर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधींतर्गत प्रति वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आता केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून १२ हजार रुपये मिळणार आहेत.
२) सरकारकडून ५ कारखान्यांना ६३० कोटींचे कर्ज मंजूर
राज्यातील साखर हंगाम अवघ्या काही दिवसात सुरु होतोय.मात्र काही कारखाने कर्जात असल्याने राज्य सरकारने राज्यातील ५ सहकारी कारखान्यांना ६३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. मात्र या ५ कारखान्यात पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा समावेश नाही. त्यामुळे पंकजा मुंडे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
३) ४० तालुक्यात लवकर दुष्काळ जाहीर होणार
राज्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने मराठवाड्यासह अन् भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. १५ जिल्ह्यांतील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असली तरी निकषांच्या छाननीनंतर ४० जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निकषाप्रमाणे सप्टेंबरमध्ये केलेल्या शास्त्रीय निकषांच्या कसोटीवर ४२ तालुके पात्र ठरले आहेत.
४) देशात गुलाबी थंडीची चाहूल
देशातून मान्सून परतल्यामुळे गुलाबी थंडीची चाहूल सुरु झाली आहे. उत्तर भारतात थंडी वाढण्यास सुरुवात झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. दिल्लीत पुढील पाच दिवस दाट धुक्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर भारतात थंडी पडण्यास सुरुवात झाली असल्याने रात्री आणि पहाटेच्या वेळी वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसंच राज्यातील तापमानात देखील घट झाल्याने थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे.
५) २६ ऑक्टोबरला पुण्यातील पाणीपुरवठा बंद
पुणे शहरातील जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे २६ ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पुण्यातील कोथरूड, कर्वेनगर, वारजे, शिवणे, भुसारी कॉलनी, शिवतीर्थनगर, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी,डेक्कन, पुलाची वाडी, शिवाजीनगरचा परिसर, औंध, बाणेर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Share your comments