मुंबई दि. 19 राज्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीत शेतकरी बांधवांचे योगदान महत्वपूर्ण आहे. कारण हवामान बदलामुळे अनेक संकटांचा त्यांना सामना करावा लागला तरी देखील नाउमेद न होता. शेतीत नवनवे प्रयोग करुन उत्पादन वाढवित आहेत. असे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक डॉ.पी. जी. पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या व महाराष्ट्र चेंबर अॅाफ कॉमर्सच्या वतीने मुंबईत आयोजित राज्यस्तरीय कृषी फलोत्पादन, सिंचन, शितगृह व वेअरहाऊसिंग परिषदेस ते प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित होते. त्यांनी पुढे बोलताना राज्याच्या कृषी फलोत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादन संघ चंद्रकांत मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली करीत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर कृषी, फलोत्पादन सिंचन, प्रक्रिया उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या उद्योग समुहांना सन्मानित करण्यात आले.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात कोकणातील व राज्यातील आंबा भाजीपाला व अन्य फळफळावळ उत्पादन व्यवसायात कार्यरत शेतकरी बांधवांसाठी एपीएमसीला पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, राज्यात शेतकऱ्यांसाठी ग्रेडिंग, पॅकींग, वाहतूक रायपनिंग चेंबर्स, शितगृह वेअरहाऊसिंग यांची उणीव पाहता शासनाने खाजगी उद्योगसमुहांच्या सहकार्याने या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, कर्नाटक आंध्रच्या आंब्याचे आक्रमण थोपविण्यासाठी-कोकण हापूसचे ब्रॅडिंग करणे, दुबई, कुवेत, कतार बरोबरच युएई मधील अन्य देशांत हापूस आंब्याची निर्यात करणे, बियाणांवरील सध्याचा 12 टक्के जी.एस.टी 5 टक्केवर आणणे यासाठी संबंधित यंत्रणांकडे संघाचा पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले.
परिषदेस महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायातून जास्तीत जास्त संधी मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादन वाढेल व त्यांची प्रगती होईल आणि या व्यवसायाचा डोलारा सावरण्यास हातभार लागेल यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स शासनाच्या सर्व यंत्रणांकडे पाठपुरावा करेल असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
यावेळी हायस्ट्रीट फिनीक्सच्या संचालक अमला रुईया उपस्थित होत्या. आपल्या देशातील अनेक भागात पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची कमतरता ओळखून आकार चॅरीटेबल ट्रस्ट लोकसहभागातून 306 सिमेंट बंधारे उभारले आहेत ज्यामुळे 392 गावांना व 4 लाख 72 हजार लोकांना त्याचा लाभ मिळत असल्याचे सांगितले.
श्रीराम ट्रान्सपोर्ट फिनान्स कं. लि.चे कन्सलटंट पी.पी.पुणतांबेकर यांनी आपल्या कंपनी मार्फत ट्रक्स, जुनी ट्रक्स अन्य वाहनांना वित्तपुरवठा करुन वाहतूक क्षेत्राला सहाय्य करण्यात येत आहे असे सांगून भविश्यात कृषीवर आधारीत उद्योगासाठीही वित्तपुरवठा करण्याबाबत प्रयत्न करु असे आपल्या भाषणांत सांगितले.
जे.एस.डब्लू.स्टील लि.चे वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक भारद्वाज यांनी शेतमाल मोठया प्रमाणात साठवणूकीसाठी सायलो उभारणी करणे आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती होईल. जे.एस.डब्लूच्या वेंडर कंपन्यामार्फत सायलो उभारणीचा कंपनीचा विचार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. यावेळी व्यासपिठावर निपॉन पेंट इंडिया प्रा.लि. चे अध्यक्ष हरदेव सिंह एस.बी, एल.आय.सी.चे वरिष्ठ अधिकारी फर्नांडिस, स्पाईस बोर्ड ऑफ इंडियाचे सुरेश एस.केमट्रॉन सायन्स लेबॉरेटरीजचे एम.डी.आशिष श्रीवास्तव, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव आर.के.धनावडे उपस्थित होते.
परिषदेचे औचित्य साधून कृषी फलोत्पादन, सिंचन, शीतगृह, वेअरहाऊसिंग आदी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कार्य केलेल्या युनिफॉस एनव्हायरोट्रॉनिक लि, अलाना सन्स प्रा.लि. मुंबई. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. पुणे, हे प्रथितयश उद्योगसमूह तसेच आर.के.धनावडे, जावली अॅग्रो प्रोडयुसर कंपनी महाबळेश्वरने स्टॅाबेरी व अन्य फळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
Share your comments