न्यू साऊथ व्हेल्सच्या आरोग्यमंत्र्यांनी घेतली विधानपरिषद सभापतींची भेट
महाराष्ट्रात उत्पादीत होणाऱ्या दूध, कापूस आणि साखर या कृषी उत्पादनांसह दूध भुकटीची ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ व्हेल्स प्रांताने आयात करावी,असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे न्यू साऊथ व्हेल्सचे आरोग्य मंत्री ब्रॅड हझार्ड यांनी सांगितले.
महाराष्ट्र आणि न्यू साऊथ वेल्स राज्यांमध्ये झालेल्या संसदीय करारानुसार ऑस्ट्रेलिया साऊथ व्हेल्सचे आरोग्य व वैद्यकीय संशोधन मंत्री ब्रॅड हझार्ड यांनी शिष्टमंडळासह विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची आज विधानभवनात भेट घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ऑस्ट्रेलियन कौन्सील जनरल टोनी हुबर, विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, न्यू साऊथ व्हेल्सच्या आरोग्य खात्याच्या उपसचिव श्रीमती सुजेन पिअर्स, धोरण सल्लागार श्रीमती ईमा चॅपमन आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, दोन्ही राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न बहुतांशी समान आहेत. सद्यस्थितीत संपूर्ण देशात नामांकित औषधांच्या तुलनेत परवडणाऱ्या जेनेरिक औषध विक्रीचे प्रमाण जास्त आहे. मात्र, त्याचे परिणाम तात्पुरते दिलासादायक असतात. भारताला आयुर्वेदची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. आयुर्वेदिक औषधी दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी ऑस्ट्रेलियाने विद्यापिठीय शिक्षणक्रमात आयुर्वेदिक पदवी अभ्यासक्रमाचा समावेश करावा, अशा सूचना त्यांनी शिष्टमंडळाला दिल्या. तसेच, उभय राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य समस्यांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने श्री. हझार्ड यांनी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तसेच, महाराष्ट्रातील आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अवलंब करण्याचा मानस व्यक्त केला.
या चर्चेदरम्यान महाराष्ट्र आणि न्यू साऊथ व्हेल्स मधील संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने दोन्ही राज्यादरम्यान झालेल्या सामंजस्य करारावर चर्चा करत असताना उभय राज्यातील विद्यार्थ्यांचे आदान-प्रदान व्हावे अशी भावना श्री. नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली. ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र राज्याची भौगोलिक स्थिती, विधीमंडळ संरचना व कामकाज आदीची माहितींचे आदान प्रदान करण्यात आले. न्यू साऊथ व्हेल्सच्या संसदीय प्रतिनिधींना महाराष्ट्र विधिमंडळाचे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला भेट देण्याचे निमंत्रण श्री. नाईक निंबाळकर यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी सभापती यांनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला.
Share your comments