
Chief Minister Devendra Fadnavis News
पुणे : महसूल विभागातील विविध बाबी, रचना, कार्यपद्धती, महसूली कायदे आदींमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहेत. त्यांच्या शिफारशींवर चर्चा करुन त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे म्हणाले. जनतेचे सेवक आहोत अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन अधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने येथील हॉटेल ऑर्चिड येथे आयोजित दोन दिवसीय महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, राज्याचे जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे आदी उपस्थित होते.
महसूल विभाग हा शासनाचा चेहरा आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नागरिकांशी सर्वाधिक जोडलेला गेला असल्याने या विभागाच्या कार्यक्षमतेवर, पारदर्शकतेवर आणि उत्तरदायित्वावर शासनाचे मूल्यमापन केले जाते.
महसूल विभाग आपल्या अतिशय प्राचीन अशा राज्य पद्धतीमध्ये देखील अत्यंत महत्त्वाचा मानलेला गेला आहे. पावणेदोन हजार वर्षापूर्वीच्या चाणक्याचे अर्थशास्त्रात या विभागाची रचना आणि महत्त्व पाहायला मिळते. छत्रपती शिवरायांनी देखील महसूलची चांगल्या प्रकारची रचना केली होती. आज्ञापत्राच्या माध्यमातून महसूल जमा करणे, त्याचे व्यवस्थापन, जमिनीचे अभिलेख जतन करणे या संदर्भात अतिशय सुंदर अशा आज्ञावली त्यांनी तयार केल्या होत्या. नंतरच्या काळामध्ये राज्यकर्त्या इंग्रजांनी एक मोठी जमीन महसूलाची पद्धत उभी केली. ज्यातून आपली महसूल पद्धती निर्माण झालेली आहे. अर्थात आपली पारंपरिक पद्धतीतील अनेक बाबींचा समावेशही यात दिसून येतो.
शासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचा जमिनीवर काम करण्याचा अनुभव एकत्रितपणे मांडण्याचे काम केले तर अधिक चांगल्या प्रकारे काम होऊ शकते. कारण हे करताना आपल्याला समस्या आणि त्यावरील उत्तरे देखील माहिती असतात. या कार्यशाळेत विभागाकडून सादर करण्यात आलेल्या विविध नियमावली, स्मार्ट डॉक्युमेंट, डॅशबोर्ड, संकेतस्थळे, त्यावर नवीन प्रणालींवर हे दिसून येते. हे तयार केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या रुपाने व्यवसाय सुलभीकरण अर्थात ‘ईज ऑफ डूईंग बिझनेस’ आणि जीवनशैलीतील सुलभीकरण (ईज ऑफ लिव्हींग) या दोन्ही गोष्टींसाठी निश्चित काय कराचये यासाठीची प्रमाणीत अशी गीता तयार करण्याचे काम मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करुन विभागाने केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शंभर दिवसाचा कार्यक्रम सर्व विभागांनी चांगल्या प्रकारे मनावर घेतला. पुढील पाच वर्षे आपल्याला कुठल्या दिशेला काम करायचा आहे त्याचा वास्तुपाठ किंवा त्याची मुहूर्त वेळ करण्याकरता शंभर दिवसाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला होता. पण ज्या कार्यक्षमतेने आणि ज्या गांभीर्याने महसूल विभाग किंवा अन्य विभाग असेल यांनी ज्या प्रकारे तो हातामध्ये घेतला ते पाहता आपले लक्ष्यांक पूर्ण करण्यात हे सर्व विभाग यशस्वी ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून
नागरिकांकडून मागवायची कागदपत्रे कमीत कमी करणे, सर्वत्र कार्यपद्धती समान असली पाहिजे आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटाईज्ड तसेच अर्ज केल्यापासूनची उत्तर मिळेपर्यंत सर्व प्रकिया स्वयंचलित अर्थात ऑटोमेटेड करून हे काम पूर्ण करायचे आहे. या संदर्भातील सर्व अभ्यासगटांनी आपला अहवाल 30 जूनपर्यंत सादर करावा. जेणेकरुन त्यावर चर्चा करून त्यातील आवश्यक शिफारशी 15 ऑगस्टपासून लागू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
काम करताना सद्हेतूने चुका झाल्या तरी निश्चितपणे पाठिशी उभे राहू. परंतु, जाणीवपूर्वक चुकीचे काम करणाऱ्यांना पाठिशी घातले जाणार नाही. सामान्य माणसाला सोप्या शब्दात जमिनीबाबत शिक्षित करण्यासाठी महसूल विभागाने आपल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एक चॅनेल काढले पाहिजे. त्यावर आठ अ, सात बारा, फेरफार आदींबाबत माहिती मिळण्यासाठी छोटे छोटे व्हिडीओ, शॉर्ट्स टाकावेत. अधिकाधिक तंत्रज्ञान स्वीकारून त्यावर आधारित बेस्ट प्रॅक्टिसेसचा अवलंब करावा. महसूल विभागाने एखादी हॅकेथॉन करावी. ज्यातून चांगल्या उपाययोजना मिळतात. जनतेचे सेवक म्हणून अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करावे, असेही ते म्हणाले.
Share your comments