
Crop Damage News
अमरावती : जिल्ह्यात एप्रिल आणि मे मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्याना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
या बाबत नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात येऊन या बाबतचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर सादर करावा, याचा निधी प्राप्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. बाधितांना तातडीने नुकसान भरपाई व्हावी, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांना व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळामुळे जिल्ह्यातील 1 हजार 174 बाधित गावामधील 794 हेक्टर केळी, संत्रा, पपई, कांदा आणि गहू शेतीचे नुकसान झाले आहे. यात अंदाजे 2 कोटी 83 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच मे मध्ये 325 गावामधील 13 हजार 639 हेक्टर मूग, तिळ, केळी, संत्रा, पपई, कांदा, ज्वारी, लिंबू पिकांचे प्राथमिक अंदाजानुसार नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे.
मे मध्ये वीज पडून 3 मनुष्य जीवित हानी झाली आहे, तर घरांच्या नुकसानीत एप्रिल मध्ये अंशतः 18 आणि 1 घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. मे मध्ये 741 घरांची पडझड झाली असून 14 घरांचे पूर्णत: पडझड झाली आहे. 12 गोठे आणि झोपडीचे नुकसान झाले आहे. मे मध्ये 29 लहान जनावरे आणि 12 मोठे पशूधन मृत झाले आहे.
मृत व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान आणि मृत जनावरांच्या मालकांना पशुधन सहाय्य अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन, पंचनामे आणि मदत कार्याला गती दिली असून बाधित शेतकऱ्यांना आणि नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रशासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून निर्देश देण्यात आले आहे.
Share your comments