मागील काही वर्षांपासून बळीराजा अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जात आहे; नैसर्गिक संकटे कमी आहेत की काय म्हणून आता सुलतानी दडपशाही देखील सुरू झाली आहे. सुलतानी दडपशाहीचा कोल्हापूर जिल्ह्यात मोठा प्रत्यय समोर आला आहे. खरीप हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे शेतकरी राजा पुरता मेटाकुटीला आला असताना रब्बी हंगामात देखील शेतकऱ्याच्या उंबरठ्यावर नाना प्रकारची संकटे येऊन उभी ठाकली आहेत. रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे वाढीसाठी तयार झालेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे; बळीराजा कसाबसा नाना प्रकारची महागडी औषधी फवारून पिकांना नवीन संजीवनी देण्याचे कार्य करत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या जोमदार वाढीसाठी खतांची योग्य मात्रा देण्यासाठी खत खरेदी करताना नजरेस पडत आहेत. मात्र अशातचकोल्हापूर जिल्ह्यातून खत कंपन्यांची दडपशाही समोर आली आहे, खत कंपन्यांनी एक अजिबो गरिब फर्मान काढून सुफला घेतला तरच युरिया मिळणार अशी सक्ती शेतकऱ्यांवर लाददण्यास प्रारंभ केला आहे. एका युरियाच्या गोणीसाठी शेतकऱ्यांना 1400 रुपये किमतीचा सुफला विकत घेण्यासाठी जोर जबरदस्ती जिल्ह्यात केली जात असल्याचे शेतकऱ्यांद्वारे कथन करण्यात आले. जिल्ह्यात खत कंपन्यांचीही जुलूमशाही सर्रासपणे सुरू असताना देखील कृषी विभाग याकडे डोकावून पाहण्यास इच्छुक नाही. त्यामुळे कृषी विभागाचा खत कंपन्यांशी काही जवळीक आहे की काय? असा संशय जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत. खत कंपन्यांच्या या जुलूमशाही वर कार्यवाही करण्याऐवजी खत विक्रेते दुकानदारांना आरोपी सिद्ध करण्यासाठी विभागाद्वारे आटापिटा केला जात असल्याचे बघायला मिळत आहे.
केंद्र सरकारने खत कंपन्यांना दर ठरविण्याचे अधिकार दिल्यापासून केंद्र तसेच राज्य सरकार खतांच्या वाढत्या दरांबाबत अंग काढताना दिसत आहे. दर ठरविण्याचे अधिकार मिळाल्यापासून खत कंपन्यांनी दरवाढीचा जणूकाही सपाटा सुरू केला आहे. खत कंपन्या दरवाढीबाबत दिलेली स्वायत्ततेचा गैरवापर करीत अवाजवी दर शेतकऱ्यांच्या माथी मारताना दिसत आहे. खतांची दरवाढ करून देखील खत कंपन्यांचे समाधान होत नसल्याने त्यांनी आता बळीराजाची पिळवणूक करण्यासाठी एक वेगळीच शक्कल शोधून काढली आहे. खत कंपन्या आता शेतकऱ्यांच्या आवाक्यात असणाऱ्या एकमेव युरिया खतासोबत सुफला खताची अनावश्यक खरेदी करण्याची बळजबरी करू लागले आहेत. आरसीएफ कंपनीच्या युरिया घेण्यासाठी सुफला घ्यावाच लागेल या सक्तीच्या लिंकिंग मुळे इतर कंपनी देखील खतांसाठी लिंकिंग करत असल्याच्या तक्रारी आता समोर येऊ लागल्या आहेत.
खत कंपन्यांची हुकूमशाही दिवसाढवळ्या सुरू असताना कृषी विभाग त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी खत विक्रेत्यांवर कारवाई करताना नजरेस पडत आहे. शेतकरी बांधव जेव्हा कृषी विभागाला खतांच्या लिंकिंग विषयी तक्रारी देतात तेव्हा कृषी विभाग संबंधित क्षेत्रातील खत विक्रेत्यांवर कार्यवाही करत या लिंकिंगच्या खऱ्या मास्टर माईंड असणाऱ्या कंपन्याना वाचविण्याचे कार्य करतांना दिसत आहे. खत विक्रेत्यांना आरसीएफ कंपनी युरिया हवा असेल तर सुफला हा घ्यावाच लागेल असे सांगून 70 हजार 700 रुपयांचा युरियाच्या गाडीसाठी खत विक्रेत्यांना 3 लाख 51 हजार 600 रुपयांचा सुफला देखील खरेदी करण्याची बळजबरी करत आहेत. तसेच कंपन्या एवढ्या चालाख आहेत की कंपनी युरिया आणि सुफलाच्या गाडीसाठी विक्रेत्यांना स्वातंत्र्य बिले देत असतात, म्हणजे भविष्यात कृषी विभागाद्वारे चौकशी करण्यात आली तर कंपनी त्यातून सुखरूप सुटेल.
Share your comments