गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव निसर्गाच्या लहरीपणामुळे भरडला जात आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकाचे मोठे नुकसान होते. खरीप हंगामात देखील अवकाळी पावसामुळे राज्यातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात बघायला मिळाला.
सध्या जिल्ह्यात लाल कांदा अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे या अवकाळी व गारपिटीमुळे काढणीसाठी तयार असलेल्या कांद्याला सर्वात जास्त फटका बसला असल्याचे शेतकरी बांधव सांगत आहेत. या नैसर्गिक संकटांमुळे कांदा उत्पादनात घट होणार असून कांद्याचा दर्जा देखील मोठा खालावणार असल्याचे सांगितले जात आहे. या नैसर्गिक संकटांमुळे कांदा पिकाचे नुकसान होणार असल्याने भविष्यात कांद्याला चांगला दर मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखले जाणारे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातच या अवकाळी व गारपिटीचा तडाखा बसला असल्याने राज्यातील कांदा उत्पादनात घट होणार एवढे नक्की. याव्यतिरिक्त प्रमुख कांदा उत्पादक राज्य मध्य प्रदेश कर्नाटक आणि गुजरात सारख्या राज्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याने त्या प्रदेशात देखील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात घट होणार असल्याचे सांगितले जात आहे तसेच मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तसेच पुढील महिन्यात देखील अवकाळी पावसाचे सावट असणार आहे. जर कदाचित आगामी काही दिवसात अंदाज वर्तवला प्रमाणे पावसाची हजेरी लागली तर कांद्याचे आधीच संकटात असलेले पीक मोठ्या अडचणीत सापडेल आणि उत्पादनात अजूनच घट होईल. जिल्ह्यासमवेतच ज्या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तेथील अंतिम टप्प्यातील लाल कांदा या पावसामुळे मोठा प्रभावीत झाला असून उत्पादनात घट ही ठरलेलीच आहे. या व्यतिरिक्त ज्या भागात गारपीट झाली आहे तेथील उन्हाळी कांद्याला देखील मोठा फटका बसला असून कांदा काढणीच्या वेळी या भागातील कांदा नासण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे आगामी काळात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली तर कांद्याच्या उत्पादनात मोठी घट होईल आणि कांद्याच्या बाजारभावात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात तसेच प्रमुख कांदा उत्पादक राज्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड झाली आहे. असे असले तरी या नैसर्गिक संकटांमुळे कांद्याचे उत्पादन किती निघते याच्यावर मोठा प्रश्न चिन्ह आहे. आगामी काही दिवसात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे आणि जर असे झाले तर या हंगामात कांदा पाच हजारांचा टप्पा गाठू शकतो असे सांगितले जात आहे.
Share your comments