मुंबई: औरंगाबाद व लातूर विभागातील काही जिल्ह्यांमध्ये लागवडीखालील क्षेत्र व पिक विमा क्षेत्रामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात चौकशीअंती विमा कंपनी दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास त्या कंपनीस काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सदस्य अजित पवार यांनी रब्बी हंगामातील पिक विमा योजनेतील गैरव्यवहारासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
दरम्यान एका उपप्रश्नास उत्तर देताना कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले, औरंगाबाद येथे 2.68 लक्ष हेक्टर क्षेत्राऐवजी 8.49 लक्ष हेक्टर विमा उतरवण्यात आला. तर, लातूर येथे 7 लाख 84 हजार क्षेत्राऐवजी 13 लाख 14 हजार क्षेत्राचा विमा उतरवण्यात आला असून, यामध्ये तफावत आढळून आली आहे. विमा कंपन्यांकडून बँक आणि कॉमन सर्विस सेंटरकडून हे काम करण्यात येते. विमा कंपन्यांबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यात तफावत निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना आखण्यात येतील. विमा कंपनीने गैरव्यवहार केला असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. बोंडे यांनी उपप्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
Share your comments