राज्यात सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना ऊस पेटण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता पाचट जाळताना नवापूर शहरात 12 एकरातील (Sugarcane Fire) ऊस आगीत जळून खाक झाला आहे. यामुळे एकच पळापळ बघायला मिळाली. अनेकांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर ऊस जाळला. यामध्ये धर्मेश पाटील या 12 लाखाचे नुकसान झाले आहे. ऊन आणि वाऱ्यामुळे अवघ्या काही वेळेत आगीने रौद्ररुप धारण केले.
शहरालगतच ही घटना झाल्याने लगेच विद्युत पुरवठा खंडीत केल्याने मोठा अनर्थ टळला. गेल्या काही दिवसांमध्ये ऊसाला आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रोज अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. वेळेत ऊसाचे गाळप झाले असते तर ह्या दुर्घटना टळल्या असत्या, असेही सध्या अनेक शेतकरी सांगत आहेत. अनेक वेळा मनधरणी केल्याने आता कुठे ऊसतोडीला प्रारंभ झाला होता. मात्र, लगतच्या शेतामध्ये पाचट हे पेटवून देण्यात आले होते. वाऱ्यामुळे ही आग पसरली.
यावेळी गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. तसेच तोडणीसाठी जादा तूकडी लावून कारखान्यात तात्काळ उस घेण्यात येईल असल्याची माहिती कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होणारच आहे. कारखान्याच्या ढिसाळ नियोजनामुळे यंदा ऊसाचे गाळप होते की नाही अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे ऊस पाण्यात होता तर आता वेळेत तोड होत नसल्याने वजनात मोठी घट होणार आहे.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे उसाला पाणी देण्यात अडचणीत निर्माण होत आहेत. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अशातच उसाला तुरे येऊन हुमणी लागली आहे. यामुळे आपला ऊस जाणार की नाही याच्या टेन्शनमध्ये अनेक शेतकरी आहेत. तसेच पैसे देऊन आपला ऊस गाळपासाठी नेला जात आहे. यामुळे सध्या शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
Share your comments