1. बातम्या

Crop Management : शेतकऱ्यांनो सद्यस्थितीत पिकांचे, फळबागांचे नियोजन कसे कराल?

जुलै आणि सप्टेंबर च्या अखेरीस झालेल्या पावसाने सरासरी भरून निघाली असली तरीही जमिनीत पाणी मुरले नाही विहिरि, कूपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही.सर्वच जिल्ह्यात पावसाअभावी कापूस तूर ही पिके निघे पर्यंत जलस्रोतांतील पाणी जानेवारीपर्यंत पुरणे अशक्य आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Agriculture News

Agriculture News

डॉ. आदिनाथ ताकटे

यंदाच्या वर्षी मान्सूनने दिलेली हुलकावणी, जुलै महिन्यात विखुरलेल्या स्वरुपात पडलेला असमतोल पाऊस ऑगस्ट महिन्यात पावसाचा पडलेला मोठ्या खंडामुळे यंदाच्या रब्बी हंगामावर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मोसमी पावसाने सरासरी भरून काढलेली असली तरीही २४ जिल्ह्यांत पावसाने सरासरी गाठलेली नाही. यंदाच्या वर्षी संततधार पाऊसच पडला नाही. जुलै आणि सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या पावसाने सरासरी भरून निघाली असली तरीही जमिनीत पाणी मुरले नाही विहिर, कूपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. सर्वच जिल्ह्यात पावसाअभावी कापूस, तूर ही पिके निघेपर्यंत जलस्रोतांतील पाणी जानेवारीपर्यंत पुरणे अशक्य आहे.

रब्बी हंगामातील सद्य स्थिती :
राज्यात रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र ५३.९७ लाख हेक्टर आहे. राज्यात जून मध्ये सरासरी पेक्षा ४६ टक्के कमी पाऊस झाला. सरासरी राज्यात २०७.६ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात १११.३ मिमी पाऊस झाला. जुलै मध्ये ३३०.९ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात ३९ टक्के जास्त ४५८.९ मिमी पाऊस पडला . ऑगस्ट मध्ये ६२ टक्के कमी सरासरी २८६ मिमी प्रत्यक्षात १०७.९ मिमी पाऊस झाला.

सप्टेंबर मध्ये १७९.७ मिमी सरासरी पाऊस पडला. प्रत्यक्षात २९ टक्के जास्त २३१.४ मिमी पाऊस पडला . पावसाळ्यात राज्यात सरासरी ९९९.२ मिमी पाऊस होतो. ७५ टक्क्याहून कमी पाऊस पडलेल्या नऊ जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांमध्ये मोठी घट येण्याचा अंदाज आहे.

यंदाच्या वर्षी मोसमी वारे माघारी परतताना पाऊस पडला नाही. बिगर मोसमी पाऊस अपेक्षित प्रमाणात झाला नाही त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी झाली आहे. २१ सप्टेंबरला सूर्य विषवृत्तावर येतो. सुर्याला विषृवृत्त ओलांडून जाण्यासाठी ४५ दिवसाचा काळ लागतो. या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात सूर्याची उष्णता जास्त मिळते. निरभ्र आकाश आणि आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्याने कमाल तापमान वाढते . यंदा २५ ऑक्टोबर पर्यंत तापमान वाढ कायम राहील.

राज्यातील पाण्याची स्थिती
राज्यात पडलेला अपुरा पाऊस, विहिरी, कूपनलिकांची खालावलेली पातळी आणि सिंचन प्रकल्पातील पाणी शेतीसाठी वापरण्यावर असलेल्या मर्यादा पाहता यंदाच्या वर्षी रब्बी हंगामावर पाणी टंचाईचे गंभीर संकट आहे. सिंचन प्रकल्पातील पाणी वापरण्यावर मर्यादा येणार आहे. राज्यातील बहुतांश धरणातील पाणी फारसे शेतीच्या वाट्याला येण्याची शक्यता नाही. कमी पाण्यावर येणारी ज्वारी, हरभरा या पिकाच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे.

अपुऱ्या पाण्याचा रब्बी हंगामावर होणार परिणाम :
यंदाच्या रब्बी हंगामावर पाणी टंचाईचे संकट असल्याने एकूण पेरणी क्षेत्रात घट येण्याचा अंदाज आहे. कमी पाण्यावर येणारी पिकाच्या पेरणीत वाढ होण्याचा अंदाज आहे. करडई, ज्वारी, हरभरा पेरणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर राहणार आहे. जास्त पाणी लागणाऱ्या गव्हाच्या पेरणी क्षेत्रात घटीची शक्यता आहे. कोरडवाहू क्षेत्रात पेरण्याची शक्यता कमी आहे. सिंचनाखाली सोय असलेल्या क्षेत्रात पेरण्या होतील असा अंदाज आहे. परंतु पीक निघे पर्यंत पाण्याची कमतरता भासणार आहे.

भारतीय हवामान विभागाने डिसेंबर पर्यंत एल निनोची स्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. परिणामी हिवाळा सरासरी पेक्षा उष्ण राहू शकतो. एल निनोचे रूपांतर सुपर एल निनोत झाल्यास पुढील मोसमी पावसाच्या हंगामावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उत्तर महाराष्ट्रात पुरेसे पाणी नसल्याने रब्बी हंगामातील कांदा लागवड क्षेत्रात अडचणी येणार आहेत. तसेच फळबागा कशा वाचवायच्या हा प्रश्न उभा ठाकणार आहे. मराठवाड्यात रब्बीच्या पेरण्या कमी होतील. पश्चिम महाराष्ट्रात डाळींब या फळ पिकास पाणी कमी पडत आहे. द्राक्ष बागाच्या ऑक्टोबर छाटण्या पाण्याअभावी खोळंबल्या आहेत. विदर्भात कापूस आणि तूर पिकाला जानेवारी पर्यंत पाण्याची गरज आहे. ही पिके निघे पर्यंत पाणी ताल गाठणार आहे. रब्बीत कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावी लागणार आहे . अशा अवर्षणग्रस्त परिस्थितीत पिकांवरील ताण कमी करण्यासाठी काही उपाय योजना निश्चितपणे उपयोगी ठरतील.

 पिकांमध्ये अवर्षणाचा ताण कमी करण्यासाठी करावयाच्या आवश्यक बाबी .
 संरक्षित पाणी देणे
 आंतर मशागत/कोळपणी करणे
 आच्छादनाचा वापर करणे
 परावर्तकाचा वापर करणे
 फवारणीद्वारे खतांचा वापर करणे
 पाण्याची फवारणी करणे
 हेक्टरी रोपांची संख्या कमी करणे
 पानांची संख्या कमी करणे

 सद्य स्थितीत पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी उपाय योजना
 सध्या उभ्या असलेल्या पिकांच्या महत्वाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पिकास एक किंवा दोन पाणी द्यावे. अवर्षणाच्या कालावधीत पीक वाचविण्यासाठी संरक्षित पाणी देणे या मध्ये दोन गोष्टी अधोरेखित होतात. एक प्रथम म्हणजे पिकांच्या कार्यसाधक मुलांच्या कक्षेतील ओलावा पूर्णपणे संपलेंला असतो व पीक सुकण्यास सुरुवात झालेली असते. तसेच मातीतील ओलावा कमी झाल्यामुळे जमिनीस भेगा पडण्यास सुरुवात झालेली असते. दुसरे म्हणजे उपलब्ध पाण्याच्या साठ्यात अत्यल्प पाणी असते. अशा परिस्थितीत हलके पाणी देण्याचा प्रयत्न केला तरी १० से.मी पेक्षा कमी पाणी बसू शकत नाही अशा परिस्थिती जेव्हा पीक सुकण्यास सुरुवात झालेली असते, जमिनीला भेगा पडलेल्या असतात व पाणी साठ्यात थोडेच पाणी उपलब्ध असते तेव्हा हलके पाणी सर्व शेतात समप्रमाणात देवून पीक वाचविण्यासाठी तुषार सिंचन हे एक हुकमी अस्र आहे.


 पिकांमध्ये आंतरमशागत/कोळपणी
सध्या उभ्या पिकाच्य दोन ओळीमध्ये वारंवार कोळपणी करावी जेणे करून बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारा जमिनीतील ओलावा थांबविण्यास मदत होईल. तसेच काही पिकांमध्ये खुरपणी करून तण नियंत्रण करावे ज्यामुळे जमिनीतील ओलावा दिर्घकाळ टिकून राहू शकेल. तसेच काही पिकांना भर लावावी त्यामुळे पाण्याच्या पाळी मध्ये अंतर ठेवून संरक्षित आणि प्रमाणशीर पाणी बसण्यास मदत होते.

 फवारणीद्वारे खतांचा वापर
सद्यस्थितीत पाणी पुरवठा अपुरा असल्याने जमिनीतील ओलावा कमी होतो. पिके कोमजतात. पानांचे तापमान वाढते पानांच्या अंतरंगातून मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ जाते व पानातील अन्नाश तयार करण्याची क्रिया मंदावते अशा वेळी पाण्याचा ताण सहन करण्यासाठी २ टक्के युरिया किंवा १.५ टक्के पोटॅशियम नायट्रेटचा फवारा पिकांवर केल्यास दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होते.


 परावर्तकाचा वापर
अवर्षणप्रवण कालावधीत सूर्याच्या उष्णतेमुळे पिकांच्या अंतरंगातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असते ते कमी करण्यासाठी केओलीन ६ ते ८ टक्के या प्रमाणात (६००ते ८०० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून) फवारा पानांवर दिल्यास सूर्यप्रकाश पानावरून परावर्तीत होऊन पिकांद्वारे होणारी पाण्याची वाफ कमी करण्यास मदत होते. पर्यायने पाण्याची बचत होऊन अवर्षण कालावधीत पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.

 पिकांमध्ये /फळ झाडांमध्ये आच्छादन
पिकांमध्ये आच्छादनाचा वापर केल्यास बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते. त्यासाठी ज्वारीचे धसकटे, गव्हाच भुसा, टाकाऊ कडबा पालापाचोळा उसाचे पाचट, प्लास्टिक पेपरचा वापर करता येतो. फळझाडांमध्ये झाडाच्या बुध्यांभोवती किंवा ओळीतील पिकांसाठी २.५ से.मी जाडीच्या हेक्टरी ५ टन आच्छादनाचा थर द्यावा यामुळे दोन पाण्याच्या पाळी मध्ये अंतर वाढण्यास मदत होते.

 अवर्षण कालावधीत रोपांची संख्या/ पानांची संख्या कमी करणे
अवर्षण कालावधी वाढल्यास रोपांची जमिनीतील ओलावा अन्नाश साठी अनिष्ट स्पर्धा वाढते. आणि ओलावा कमी पडल्यास सर्व पिकांचे नुकसान होते ते टाळण्यासाठी विशेषत फुलोरा ते दाणे भरन्याच्या वेळी रोपांची संख्या १/३ प्रमाणात किंवा अवर्षणाच्या तीव्रतेनुसार २५ ते ५० टक्क्यांनी कमी करावी.
अवर्षण कालावधीत पिकातील अंतरंगातून मोठ्या प्रमाणात निष्कासन होते. ते थोपविण्यासाठी ताटांवरील खालील पाने कमी करावी आणि वरील ४ ते ५ पाने ठेवावी. त्यामुळे अवर्षणाचा ताण कमी होण्यास मदत होईल.

 अवर्षणापासून फळबागा वाचविण्यासाठी...
• आच्छादनाचा वापर
• परावर्तकाचा वापर
• ठिबक सिंचनाचा वापर
• मडका सिंचन
• अर्ध्या आळ्यास पाणी देणे
• सलाईन बाटल्यांचा वापर
• शक्य असल्यास बहार बदलणे

 मडका सिंचन
कमी क्षेत्रातील व जास्त अंतरावरील फळझाडांना ही पाणी देण्याची पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. या पद्धतीत लहान झाडांना साधारणता दोन ते तीन वर्षाकरिता ५ ते ७ लिटर पाणी बसणारी लहान मडकी वापरावीत व जास्त वयाच्या मोठ्या झाडांकरिता १० ते १५ लिटर पाणी बसेल अशी मडकी वापरावीत. मडकी शक्यतो जादा छिद्रांकीत किंवा आढीत कमी भाजलेली असावीत. पक्क्या भाजलेल्या मडक्याच्या बुडाकडील बाजूस लहानसे छिद्र पाडावे व त्यामध्ये कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी बसवावी. प्रत्येक झाडास दोन मडकी जमिनीत खड्डा खोडून बसवावीत व त्यामध्ये संध्याकाळी पाणी भरून ठेवावे. मडके पाण्याने भरल्यानंतर त्यावर झाकणी किंवा लाकडी फळी ठेवावी. त्यामुळे मडक्यातील पाणी बाष्पीभवनाने वाया जाणार नाही. या पद्धतीमुळे ७०- ७५ टक्के पाण्याची बचत होते.

 फळझाडामध्ये आच्छादनाचा वापर केल्यास होणारे फायदे
आच्छादनाचा उपयोग केल्यास पावसाचा जमिनीवर पडण्याचा वेग मंदावतो आणि जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरले जाते. आच्छादनाच्या वापरामुळे जमिनीची धूप कमी होते. आच्छादनामुळे जमिनीतील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग मंदावतो आणि जमिनीत जास्त काळ टिकतो. तणांच्या वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. जमिनीत योग्य तापमान राखण्यास मदत होते. जमिनीला भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते अथवा जमिनीस भेगा पडण्याचा कालावधी लांबतो. आच्छादनाच्या वापराने दिलेल्या खतांचा जास्त कार्यक्षमतेने उपयोग करून घेता येतो. उन्हाळी हंगामात दोन पाण्याच्या पाळ्यातील कालवधी वाढविता येतो. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. आच्छादनामुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनातही वाढ होते.

लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे, मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विदयापीठ , राहुरी, मो. ९४०४०३२३८९

English Summary: How will the farmers plan the crops and orchards in the current situation Crop Management Published on: 24 October 2023, 04:02 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters