महाराष्ट्रात हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आसमानी संकटामुळे आधीच शेतकरी हतबल आहे, आधी अतिवृष्टी नंतर अवकाळी व त्यामुळे बिघडलेल्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले गेले आहे. निसर्गाच्या लहरीपणाच्या ह्या फटक्यातून शेतकरी राजा कसाबसा बाहेर येत होता, पण आता शेतकरी राजाला सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे.
मराठवाड्यात बदलत्या हवामानामुळे पपईच्या बागाला मोठा फटका बसला होता, आधीच संकटात असलेल्या जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव मिळत नसल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. दोन्ही बाजूकडून होणाऱ्या या पिळवणुकीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या पपईच्या बागा नागरून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक पिकातून शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने जिल्ह्यातील निर्मल ह्या शेतकऱ्याने सात हजार पपईची लागवड केली. पण यावर्षी पपईला चांगला बाजारभाव न मिळाल्याने या शेतकऱ्याने पपईची बाग उपटून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
निर्मल यांच्या मते, यंदा वातावरणाच्या असंतुलणामुळे पपईच्या पिकात अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला, त्यामुळे त्यांनी लाखो रुपयांच्या फवारण्या बागावर केल्यात, आणि आता पपईचे बाजारभाव पार लुडकलेत त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पपईला खर्च लाखोंचा पण बाजारभाव कवडीमोल
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील थेरगाव येथील सोमनाथ निर्मल या शेतकऱ्याने यावर्षी पारंपरिक पीक पद्धत्तीला फाटा देत, फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला, निर्मल यांनी पपई लागवड करण्याचे ठरवले, त्यांनी सात हजार पपईची लागवड केली. पण यावर्षी अवकाळी पावसामुळे पपई पिकाला मोठा फटका बसला, या अवकाळीमुळे त्यांना महागड्या औषधंची फवारणी करावी लागली तसेच त्यांना पपईची बाग वाचवण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागली. निर्मल यांनी अफाट कष्ट घेऊन पपई बाग वाचवली आणि उत्पादन तयार केले पण आता पपईला सुमारे दोन ते तीन रुपये किलो एवढा कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याने ट्रॅक्टरच्या साह्याने फळबागा उपटण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मल यांनी सांगितले की, काढणीचा खर्च देखील आता त्यांना उचलला जाऊ शकत नाही कारण आधीच खुप मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांनी पपईची बाग संपूर्ण नष्ट करण्याचा निर्णय घेतला.
सांगा कशी करायची शेती?
जर अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याने कोणते पीक घ्यायचे, असा सवाल आता उभा ठेपला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने फळबागांची लागवड केली पण यातून देखील त्यांना उत्पन्न मिळताना दिसत नाही, शिवाय यासाठी निसर्ग आणि शासन हे दोन्ही समान जबाबदार असल्याचे शेतकरी आपले मत व्यक्त करत आहेत. एकंदरीत सांगा शेती करायची कशी? हा प्रश्न शेतकरी राजा आता विचारता झाला आहे.
Share your comments