बंगाल उपसागरात आलेल्या अम्फाम चक्रीवादळामने बाष्प खेचून नेल्याने राज्यात कोरडे हवामान आहे. यातच राज्यात उन्हाचा चटकाही वाढणयास सुरूवात झाली आहे. काहीशा ढगाळ हवामानामुळे उकाडा अधिक जाणवत आहे. आज विदर्भात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे. तर राज्यातील इतर भागातही उन्हाचा पार चढलेला असणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
अम्फाम चक्रीवादळामुळे उत्तर व वायव्येकडून कोरडे वारे मध्य भारताकडे येत आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, विदर्भात उष्णतेचा ताप वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तापमान चाळीशी पार गेले आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान बहुतांशी ठिकाणी ३४ ते ४३ अंश कोकणात ३३ ते ३५ अंश, मराठवाड्यात ४० ते ४३ अंश तर विदर्भात ४० ते ४४ अंशांच्या दरम्यान आहे. आजपासून राज्यात उष्ण कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.
काल सांयकाळी आम्फम हे भयंकर चक्रीवादळ प. बंगाल व ओडिशा किनारपट्टीवर धडकले. वादळाने दोन्ही राज्यांत प्रचंड नुकसान झाले. ताशी १९० किमी वेगाने वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाल्याने अनेक भागांत हाहाकार माजला. शेकडो झाडे तसेच विजेचे खांब उन्मळून पडले. यात दोन्ही राज्यांत मिळून १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प. बंगालमध्ये ५ हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले. ओडिशा किनारपट्टीलगत कच्ची घरे पडली. हवामान खात्यानुसार, बुधवारी दुपारी हे वादळ प. बंगालच्या दिघा आणि बांगलादेशच्या हटियादरम्यान किनारपट्टीवर धडकले.
दरम्यान रविवारी मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटावर डेरेदाखल झाला. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनने कोणतीही प्रगती केली नाही.
Share your comments