मुंबई: राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने कृषी व्यवसाय मार्गदर्शन सेवा आणि हेल्पलाईन सुविधा सुरू केली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे एकाच वेळी राज्यातील 5 हजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती आणि संदेश पोहचविण्यात येणार आहे, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
मंत्रालयात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी रिलायन्स फाऊंडेशनच्यावतीने सुरु केलेल्या 1800 419 8800 या हेल्पलाईन सेवेचा शुभारंभ सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, महाव्यवस्थापक प्रतिक पोखरकर, रिलायन्स सोशल फाऊंडेशनचे सेंथिल कुमारन, दीपक केकाण उपस्थित होते.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि रिलायन्स सोशल फाऊंडेशन यांच्यामध्ये कार्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत करार झाला आहे. त्यानुसार राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना कृषी आधारित व्यवसाय उभारणीसाठी रिलायन्स फाऊंडेशनमार्फत संवाद तंत्रज्ञानाद्वारे कृषी व्यवसाय मार्गदर्शन सेवा सुरू करण्यात आली आहे. 1800 419 8800 या टोल फ्री क्रमांकावर सहकारी संस्थांना व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन व व्यवसायासंदर्भातील अडचणी सोडविल्या जाणार आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले. यावेळी रिलायन्स सोशल फाऊंडेशनचे दीपक केकाण यांनी रिलायन्समार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
या माध्यमातून ऑडीओ-व्हॉईस संदेश, संस्थांनी सुरू केलेल्या व्यवसायांचे व्हिडिओ संदेश, ॲपद्वारे कृषी व्यवसायावर चर्चा व मार्गदर्शन करणे, कृषी क्षेत्रातील घडामोडींची माहिती देणे, ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे कृषी व्यवसायांबाबत अडचणी-चर्चा घडवून आणणे, यशोगाथा इ. चे प्रसारण करणे, कार्यक्षेत्रात तज्ञ मंडळीमार्फत कृषी व्यवसायांवर, अडचणींवर मार्गदर्शन करणे शक्य होणार आहे.
यापुढे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील एक हजार गावांमधील ग्रामप्रवर्तकांना या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. सहकारी संस्थांनी या संवाद माध्यमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. देशमुख यांनी केले आहे.
Share your comments