मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात शुक्रवारी सकाळपासून पावसाने जोर धरला होता. कोकणातही पाऊस पडत असून आज संपूर्ण कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ येथे २९ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस पडेल. छत्तीसगडचा उत्तर भाग आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झापला आहे. राज्यातील अनेक भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
आज राज्यातील अनेक भागात हलका ते मध्यम तर विदर्भात जोरदार पाऊस पडेल. उद्यापासून राज्यात पावसाची काहीशी उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. छत्तीसगड आणि मध्यप्रदेशच्या परिसरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र हे समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच बंगालच्या उपसागराचा उत्तर भाग ते गंगानगर दरम्यान मॉन्सूनची आस असलेलवा पट्टा सक्रिय आहे. याशिवाय दक्षिण उत्तर रायलसीमा ते दक्षिण तामिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे.
हा पट्टा तामिळनाडू ते कोमोरिन परिसराकडे काही प्रमाणात सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह, छत्तीसगड व मध्य प्रदेशातील काही भागात पाऊस होत असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान ३० ऑगस्ट रोजी गोव्यासह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. अरबी समुद्रात ताशी ५५ किमी. वेगाने वारे वाहतील. मच्छीमारांनी समुद्रात उतरु नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
Share your comments