राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असून अनेक भागात शनिवारी आणि रविवारी परतीच्या पावसाने हजेरी लावली. आजही कोकण, मध्य महाराषट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी होत आहे, हे क्षेत्र रविवारी पश्चिम उत्तर दिशेने सरकत होते. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनमपासून ते आग्नेयेकडे ४०० किलोमीटर तर काकिनाडापासून आग्नेयेकडे ४९० किलोमीटर अंतरावर होते.
आज त्या क्षेत्राची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीदरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर अंदमान समुद्राच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही दिवस राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असून अनेक भागात पाऊस पडत आहे. सध्या राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे. राज्यातील काही भागात होत असलेल्या पावसामुळे धुक्याची झालर पसरत आहे. पहाटे हवेत काहीसा गारवा तयार होत आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर येथे १८.७ अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमान नोंदविले गेले. दरम्यान शनिवारी आणि रविवारी झालेल्या पावसामुळे राज्यभरात सोयाबीन , तूर, कांदा, टोमॅटो, ऊस मका आणि फळबांगाचे मोठ नुकसान झाले.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात परतीच्या पावसाने हजेरी लावली. तर दक्षिण रायगडमधील महाड, पोलादपूर, म्हसळा या तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरील लावली. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. टोमॅटो यासारखी पिके धोक्यात आली आहे.
Share your comments