मॉन्सून देशातील सर्व भागात पोहचला असून आपला रंग ही दाखवत आहे. मध्य भारत आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रासह देशातील ५ राज्यात पुढील ४ ते ५ दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
ओडिशा, बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पूर्वी उत्तर प्रदेशवरील चक्री वाऱ्यांचा क्षेत्र हे सक्रिय झाले आहे. पूर्वी मध्य प्रदेशापासून ते विदर्भापर्यंत हा पट्टा बनलेला आहे. पुढील २४ तासात सौराष्ट्र आणि कच्छ तसेच दक्षिण गुजरातच्या परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्र गोवा, किनारपट्टीय कर्नाटक, केरळमधील काही भागातील आंध्रप्रदेश, तेलगांना, उप - हिमालयी, पश्चिम बंगाल, सिक्किम, पुर्वेकडील भारतातील काही भागात मध्य स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे. दरम्यान कोकण किनारपट्टीवर दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे.
रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईसह कोकणात धुवांधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीतील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. ठाण्यात सर्वाधिक ३७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभर पाऊस पडत होता. मुंबईतील पूर्व उपनगरात जोरदार पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्याबरोबरच घरांमध्ये पाणी शिरले. मालाड, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. ठाण्यात कमी जास्त प्रमाणात जोर होता. पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ढगाळ हवामान असून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मावळातील लोणावळा येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली, जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाला.
Share your comments