राज्याच्या बहुतांश भागात हाहाकार उडवून दिलेल्या पावसाचा जोर शनिवारी (१७ ऑक्टोबर) ओसरेल असा अंदाज आहे. दरम्यान आज शुक्रवारी कोकण विभागात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे.
बंगालच्या उपसागरातून आलेल्या आणि अरबी समुद्राच्या दिशेने निघालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाने महाराष्ट्रातून जात असताना मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. बुधवारी पावसाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला तडाखा दिला. बाष्प घेऊन आलेला हा पट्टा आता कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांवर स्थित आहे. त्यामुळे आज या भागांत काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. हा पट्टा पुढे अरबी समुद्रात राज्याच्या किनारपट्टीवरून गुजरातच्या किनारपट्टीवर जाणार आहे. त्यानंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होईल.
महाराष्ट्राच्या दक्षिण भागात अससलेले चक्रातार वारे अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भाग व महाराष्ट्राची किनारपट्टी आणि दक्षिण गुजरातकडे सरकणार आहे. आज आणि उद्या या वाऱ्यांची स्थिती आणखी कमी होऊन ते विरुन जाणार आहे. दरम्यान येत्या सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होऊ शकतो. दरम्यान शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील. तर विदर्भात काही प्रमाणात उघडीप राहील. तर रविवारी ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल.
Share your comments