मॉन्सूनचा प्रवाह वाढल्याने अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे येत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाचा जोर वाढला आहे. काल कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात अतिवृष्टी झाली. यासह देशातील इतर राज्यातही दमदार पाऊस झाला पण देशाच्या राजधानीमध्ये अजून उष्णतेमुळे नागरिक हैरान आहेत. पुढच्या आठवड्यापर्यंत मॉन्सून राजधानी दिल्लीत दाखल होईल अशी आशा हवाामान विभागाने वर्तवली आहे.
दरवर्षी मॉन्सून २७ जूनपर्यंत दिल्लीत पोहोचत असतो. पण आयएमडीचे क्षेत्रिय वेधशाळेचे केंद्र प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले की, १९-२० जून पर्यंत प. बंगाल आणि आसपासच्या राज्यातून चक्रिय वारे हवा दक्षिण - पश्चिम उत्तर प्रदेशात पोहोचतील. यामुळे २२-२४ जून पर्यंत पश्चिमी उत्तर प्रदेश, उत्तराखंडातील काही भागात पुर्वी राजस्थान, आणि पूर्वी हरियाणामध्ये मॉन्सून दाखल होईल. यामुळे मॉन्सून दोन ते तीन दिवसाआधीच दिल्लीत धडकणार असल्याचे ते श्रीवास्तव म्हणाले. यंदा सरासरी पाऊस १०३ टक्के होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्लीत आज आणि उद्या उष्ण हवामान राहणार आहे. दिल्लीच्या बहुतांश भागात ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान उत्तर कोकण आणि परिसरावर असलेली चक्राकर वाऱ्याची स्थिती , झारखंडपासून उत्तर कोकणापर्यंत असलेले वाऱ्यांचे जोडक्षेत्र, अरबी समुद्रातून वाढलेले मॉन्सूनचे प्रवाह यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणात जोरदार वारे वाहत आहेत. किनारपट्टीवर ढगांची दाटी झझाली असून पावसानेही जोर धरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी १०० पेक्षा अधिक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी मालेगाव व येवला तालुक्यातील पश्चिम भागात वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सिन्नरसह दिंडोरी तालुक्याच्या पूर्व भागातही दमदार पाऊस झाला. मराठवाडा आणि खानदेशातील जळगाव, धरणगाव, चोपडा, पारोळा, आदी भागात वरुण राजाने हजेरी लावली.
Share your comments