राज्यात आठवडाभरापासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, मका, मिरची, केळी, पपई, द्राक्षबागा यांसह इतर हाताशी आलेली पिके पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारकडून पंचनामे सुरू आहेत. मात्र अजूनही राज्यात पावसाचा जोर कमी न झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणाल नुकसान होत आहे. यामुळे सरकारने सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी केली शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
आठवडाभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, वाशिम, नाशिक, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं आहे. फळबागा, पोल्ट्री फार्म, शेततळे, वाहने, शेड, तसेच घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच अजून पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पिकांचे अजुन नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील अनेक भागातील कांदा आणि बटाटा पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यांमधील वेचणीला आलेला कापूस पावसामुळे पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यालातील फळबागांना गारपिटीचा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यात काढणीला आलेली पपई, केळी जमीनदोस्त झाली आहेत. मागील हंगामात पुरेसा पाऊल न झाल्याने दुष्काळसदृश्य परीस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मागील हंगामात जास्त पिक आलं नाही. आणि आता रब्बी हंगामात चांगल्या उत्पनाची अपेक्षा असताना या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. यामुळे सरकारने पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Share your comments