मागील काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पारा हा 40 अंशाच्या पार गेला आहे.
या अवस्थेत याचा परिणाम शेती पिकांवर देखील जाणवत असून पिके वाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरांमधील रस्ते दुपारी निर्मनुष्य होऊन जात आहेत. अशा उकाड्यापासून काही दिवसात सुटका मिळेल अशा आशयाची बातमी समोर आली. त्यामुळे एक दिलासा मिळू शकतो. येत्या 13 एप्रिल नंतर राज्यात असलेली उष्णतेची प्रचंड लाट ओसरेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटक या भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे या भागात पावसाला पोषक हवामान असल्याने ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे उकाड्याने त्राही त्राही झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भात उष्ण लाटेचा इशारा
सध्या संमिश्र प्रकारचे हवामान पाहायला मिळत असून राज्यातील काही भागांमध्ये तीव्र स्वरूपाचा उन्हाचा चटका जाणवत आहे. तर पश्चिम महाराष्ट्र मधील सातारा, उस्मानाबाद आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये शनिवारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. आता कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक असे वातावरण असून आज या भागात ढगाळ हवामान राहील व विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नक्की वाचा:Success Story : हिंगोलीचे कलिंगड काश्मीर वारीला; मिळवला लाखोंचा नफा
आज पश्चिम विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील बऱ्याच भागांमध्ये उष्णतेचा पारा थोडा थोडा कमी होत आहे परंतु कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिकच आहे.
जर आपण कालचा विचार केला तर 14 जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस अंशांच्या पार होते. शनिवारी अकोला आणि जळगाव येथे उच्चांकी 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर त्याखालोखाल नगर, चंद्रपूर आणि अमरावती येथे 42 अंशा पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. उरलेल्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तापमान 32 ते 41 अंश या दरम्यान आहे.
Share your comments