गेल्या आठवड्यापासून विदर्भाच्या काही भागात उन्हाचा पारा वाढत आहे. यामुळे सकाळपासून झळा तीव्र होत आहे, येत्या मंगळवारपासून विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याविषयीचे वृत्त अॅग्रोवनने दिले आहे.
ही लाट पुढील पाच ते सहा दिवस राहणार असल्याने कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितले. राज्यातील अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात उन्हाचा चटका आहे. यामुळे कमाल तापमानातही चढ-उतार होत आहे. मात्र विदर्भातील मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान चाळिशीपार गेले आहे.
मराठवाड्यातही काही ठिकाणी तापमान वाढत असल्याने पारा ४० अंश सेल्सिअसवर सरकत आहे. शनिवारी सकाळी २४ तासात चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविण्यात आले. सध्या दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टी व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ आणि ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच छत्तीसगडच्या दक्षिण भागातही चक्रीय वाऱ्याची स्थिती असून, ती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे.
दक्षिणेकडील आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच अंदमान समुद्राच्या उत्तर भाग आणि म्यानमारची किनारपट्टीजवळ कमी तीव्र दाबाचे क्षेत्र सक्रीय होण्याची संकेत आहेत. आज त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून त्याचे रुपांतर चक्रीय वाऱ्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरण होत असल्याने राज्यातील कमाल तापमानात वेगाने बदल होत आहे.
Share your comments