पर्यटकांची जुन्नर द्राक्ष महोत्सवाला पसंती

Saturday, 23 February 2019 07:23 AM


मुंबई:
जुन्नर येथील गोळेगाव (लेण्याद्री) येथे नुकत्याच झालेल्या द्राक्ष महोत्सवाला (Grape Festival) गुजरात, राजस्थानसह राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, अलिबाग, औरंगाबाद आदी शहरातील सुमारे 800 पर्यटकांनी भेट देऊन ग्रामीण आणि कृषी पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. शहरी भागातील नागरिकांना आणि विशेषत: तरुण मुले, विद्यार्थी यांना गावाकडील पर्यटनात तसेच शेती-शिवाराच्या पर्यटनात मोठा रस असून त्याचा उपयोग ग्रामीण भागाच्या पर्यटन विकासासाठी केला जाईल, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी सांगितले.

एमटीडीसीचे माळशेजघाट रिसॉर्ट आणि जुन्नर तालुक्यातील द्राक्ष शेतकरी यांच्या सहभागातून गोळेगाव (लेण्याद्री) येथे 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शहरी भागातील नागरिकांना द्राक्षांची बाग कशी असते, शेतकरी त्याचे उत्पादन कसे घेतात, द्राक्षांचे वेगवेगळे प्रकार कोणते,द्राक्षांपासून वाईनची निर्मिती कशी होते, अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याबरोबरच द्राक्षांची प्रत्यक्ष शेतात जाऊन चव चाखण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यास शहरी भागातील पर्यटकांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अभिमन्यू काळे यांनी सांगितले. शहरातील दगदग आणि धावपळीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा मिळण्याच्या दृष्टीने शहरी भागातील लोकांचा ग्राम आणि कृषी पर्यटनास मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी नाममात्र प्रवेश फी आकारण्यात आली. त्यातून तसेच द्राक्षांच्या विक्रीतून शेतकऱ्यांचा चांगला व्यवसाय झाला.

केळी, डाळिंब, हुरडा आणि गुळ महोत्सव

व्यवस्थापकीय संचालक श्री. काळे म्हणाले की, द्राक्ष महोत्सवाचे यश पाहता जुन्नर येथेच आता पुढील महिन्यानंतर डाळिंब महोत्सव तसेच मलबेरी महोत्सव आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. याशिवाय राज्याच्या विविध भागात म्हणजे जळगाव भागात केळी महोत्सव, विदर्भात संत्रा महोत्सव, सांगोला (जि. सोलापूर) भागात डाळिंब महोत्सव, ज्वारीचे उत्पादन होणाऱ्या मराठवाडा, सोलापूर भागात हुर्डा महोत्सव, सातारा, सांगली, कोल्हापूर भागात गुळ महोत्सव, कोकणात आंबा महोत्सव, काजू महोत्सव यांसारखे पर्यटन महोत्सव स्थानिकांच्या सहभागातून करण्याचा विचार आहे. शहरी भागातील पर्यटकांना ग्रामीण आणि कृषी पर्यटनाकडे आकर्षित करुन ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना देता येऊ शकेल, असे ते म्हणाले.

शेती आधारित पर्यटन प्रमोट करता येईल-पर्यटक मनोज हडवळे

द्राक्ष महोत्सवात सहभागी झालेले पर्यटक मनोज हडवळे म्हणाले की, जुन्नर द्राक्ष महोत्सवाची तयारी अप्रतिम होती. प्रवेश फी 50 रुपये घेत होते, पण शेतकरी येणाऱ्या पर्यटकांना टोपी घालून स्वागत, खिशाला द्राक्ष महोत्सवाचा बिल्ला, लिंबू सरबत, 200 ग्रॅम हिरवी आणि 200 ग्रॅम काळी द्राक्षे, सोबत द्राक्ष बागेची माहिती असे सगळे भरभरून देत होते. जुन्नर द्राक्ष महोत्सव जबाबदार पर्यटनाचे मॉडेल होऊ शकतो. द्राक्ष महोत्सवासारखेच हापूस, डाळिंब, मलबेरी, तांदूळ (काढणी लावणी), रानभाजी, रानमेवा, कांदा, टोमॅटो, यात्रा, तमाशा अशा अनेक थीमवर शेती आधारित पर्यटन प्रमोट करता येईल, असे ते म्हणाले.

द्राक्ष महोत्सव यशस्वी होण्यासाठी एमटीडीसीच्या वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा, माळशेजघाट एमटीडीसी रिसॉर्टचे व्यवस्थापक विष्णू गाडेकर यांच्यासह जुन्नर तालुक्यातील द्राक्ष शेतकऱ्यांनी सहभाग दिला.

Junnar grape festival जुन्नर द्राक्ष महोत्सव Maharashtra Tourism Development Corporation महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कृषी पर्यटन agri tourism
English Summary: Gujarat, Rajasthan and Maharashtra's urban tourists Preferred Junnar Grape Festival

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.