21 जून पासून सुरु झालेल्या कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत राज्यातील जवळजवळ चाळीस हजार गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये जवळजवळ राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविल्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचावे यासाठी राज्यात कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येते. आज या मोहिमेचा समारोप होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेच्या समारोप प्रसंगी पीक स्पर्धा विजेता शेतकऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे.
तसे पाहता दरवर्षी ही मोहीम कृषी दिनाच्या निमित्ताने एक जुलैपासून राबवली जाते. परंतु तोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पेरणी आणि जमीन मशागत याचा कालावधी हा निघून गेलेला असतो. त्यामुळे या वर्षी ही मोहीम 21 जून पासून राज्यात राबवण्यात आली. त्यानुसार राज्यात दररोज एक विषय घेऊन कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ, शेतकरी मित्र यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावर्षी मोहिमेच्या पहिल्या दिवशी राज्यातील पाच हजार 564 गावांमध्ये बीबीएफ लागवड तंत्रज्ञानाविषयी माहितीपूर्ण कार्यक्रम झाला. त्यामध्ये जवळजवळ चौदा हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच बीजप्रक्रिया तंत्रज्ञानाविषयी राज्यातील पाच हजार 671 गावांमध्ये कार्यक्रम घेऊन त्यामध्ये 88 हजार 727 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर कसा करावा याबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये पाच हजार 457 गावांमधील जवळपास 88 हजार 670 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच एक गाव एक कापूस वाण, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञानाबाबतजवळपास चार हजार सहाशे नव्व्याण्णव गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये आठ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
तसेच या मोहिमेचा समारोप प्रसंगीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पीक स्पर्धा विजेता शेतकऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचेथेट प्रक्षेपण कृषी विभागाची यूट्यूब चैनल वर प्रसारित होणार असल्याचे संचालन विकास पाटील यांनी सांगितले.
Share your comments