शिर्डी: महाराष्ट्रात यावर्षी पाऊस कमी झाल्याने काहीशी चिंता आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. तसेच राज्य शासनाद्वारे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठीही केंद्र शासन भरीव मदत करेल, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत राज्यात विविध प्रकल्पांची कामे करण्यात येत आहे अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली.
शिर्डी येथे साई समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप, संस्थानच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन आणि राज्यातील अडीच लाख घरकुलांच्या लाभार्थींना घरकुलाच्या चावीचे वितरण आणि राज्यातील इतर लाभार्थ्यांच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, खासदार रावसाहेब दानवे, दिलीप गांधी, सदाशिव लोखंडे, आमदार शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष सुरेश हावरे आदी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून 16 हजार गावे टंचाईमुक्त झाली असून 9 हजार गावात कामे सुरू असल्याचे ते म्हणाले. राज्याने या योजनेच्या अंमलबाजवणीत चांगली कामगिरी केल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या पिकांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याचा अनेक शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्र शासन नेहमीच महाराष्ट्राला विविध योजना आणि प्रकल्पांसाठी मदत करीत असते. यावर्षी निसर्गाची अवकृपा झाल्याने 201 तहसीलमध्ये पाऊस कमी झाला आहे. अशावेळी या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र शासन मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
उत्पादन मूल्यावर आधारित दीडपट भाव देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. शेतकऱ्यांसाठी स्वयंपूर्णता आणण्यासाठी केंद्र सरकार काम करीत आहे. त्या योजनांची अंमलबजावणी राज्यात चांगल्या प्रकारे व्हावी, असे काम सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सध्याच्या परिस्थितीत केंद्र शासन मदतीचा हात देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Share your comments