निसर्गाचा लहरीपणा हा शेतकऱ्यांसाठी खुपच त्रासदायक सिद्ध होत आहे, डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पडसाद हे आता उमटतांना दिसत आहेत. शेतकरी राजाने उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक पीक पद्धत्तीला फाटा दिला आणि नगदी तसेच फळ पिकांची लागवड करायला सुरवात केली. यामुळे बळीराजाचे उत्पन्न तर वाढलेच नाही, पण मात्र बळीराजा कर्जबाजारी झाला एवढे नक्की. याचेच एक उदाहरण समोर आले आहे सांगली जिल्ह्यात.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एका शेतकऱ्याने उत्पन्न वाढीच्या आशेने द्राक्ष लागवड केली, यासाठी या शेतकऱ्याने दरवर्षी लाखोंचा खर्च केला पण यातून या शेतकऱ्याला उत्पन्न तर सोडा खर्च सुद्धा वसुल झाला नाही परिणामी हा द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला. दरवर्षी होत असलेले नुकसान आणि वाढते कर्ज यामुळे त्रस्त होऊन या शेतकऱ्याने आत्महत्या करून आपले आयुष्य संपविले.
सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील मालगाव ह्या गावात चिदानंद घुळी हे शेतकरी वास्तव्याला होते. चिदानंद यांनी द्राक्षे लागवड केली होती, पण द्राक्ष पिकातून तीन वर्षांपासून त्यांना नुकसान सहन करावे लागत होते. द्राक्ष बागा जोपासण्यासाठी त्यांनी बँकेचे तसेच सावकारी कर्ज काढले होते, तीन वर्षांपासून कमाई नसल्याने ह्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज वाढतच चालले होते. यावर्षी देखील द्राक्ष तोडणी करण्याच्या तोंडावर आले असताना अवकाळी ने हजेरी लावली आणि या शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायची हा प्रश्न चिदानंद यांना भेडसावत होता, शेवटी चिदानंद यांना दुसरा कुठला पर्याय दिसला नाही म्हणुन शेतातील आंब्याला गळफास घेऊन आपला देह त्यागला.
घुळी यांनी पारंपरिक पीकांना फाटा देत द्राक्षे लागवड केली, सुरवातीला यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले पण गेल्या तीन वर्षांपासून त्यांना यातून प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे, यावर्षी देखील ऐन काढणीच्या वेळी अवकाळीने हजेरी लावली आणि घुळी यांचा तोंडचा घास अवकाळी पावसाने हेरावून घेतला. गेल्या तीन वर्षात घुळी यांनी द्राक्ष जोपासण्यासाठी लाखोंचा खर्च केला, त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोझा हा वाढतच गेला, शेवटी विवचनेतून घुळी यांनी आपले जीवन संपविले.
Share your comments