संत्रा उत्पादक शेतकरी व निर्यातदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार कडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आयात शुल्कात 50 टक्के अनुदान देण्यात येईल. त्यासाठी राज्य शासनाने 169 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिली आहे.
भाजपाचे आमदार मोहन मते यांनी संत्रा निर्यात करण्यासाठी निर्यात सुविधा केंद्र स्थापन करण्याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्यात फळे, फुले व भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत एकूण 45 आधुनिक निर्यात सुविधा केंद्रे कार्यरत आहेत. तसेच विदर्भात संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला जावा म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
अब्दुल सत्तार म्हणाले की, "संत्रा निर्यातदारांना बांगलादेशने आयात शुल्क वाढवल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला. अनेक शेतकऱ्यांना त्यांचे संत्रा पीक हे परदेशी न पाठवता स्थानिक बाजारपेठेत पाठवावे लागले. त्याचा परिणाम बाजारभाव गडगडल्याने आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यासाठी राज्य शासनाने 169 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद केली असून, संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा दिला जाईल, अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत दिली .
Share your comments