सातारा : राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल देत आहे. या विभागाला तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेायी सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
गोडोली, सातारा येथे उभारण्यात येणाऱ्या अधीक्षक कार्यालय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक अभियंता संतोष राखडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक वैभव वैद्य आदी उपस्थित होते.
पोलीस विभागाच्या धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाला नवीन वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, 17 ठिकाणी स्वतंत्र उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतींचे काम सुरु आहे. या विभागाच्या विविध प्रस्तांवाना मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे.
पोलीस विभगाच्या जागेत उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालयत होत आहे. पोलीस विभागाने त्यांच्यासाठी नवीन जागेचा प्रस्ताव द्यावा. प्रशासनाला सुविधा दिल्या तर प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी जोमाने काम करतात. समाजामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे. उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन इमारतीचे काम तातडीने सुरु करा. काम दर्जेदार झाले पाहिजे सातारच्या वैभवात भर घालणारी वास्तु निर्माण करा, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभाग चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात 25 टक्के वाढ झालेली आहे, असे प्रास्ताविकात आयुक्त श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले
नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये तळ घर, तळ मजला, पहिला मजला असे एकूण 2 हजार 207.69 चौ.मी क्षेत्रफळ असणार आहे. त्याचबरोबर विश्रामगृह इमारतीचेही बांधकाम होणार आहे त्याचे क्षेत्रफळ 504.11 चौ.मी. असणार आहे.
Share your comments