नवी दिल्ली: भारतात गेल्या पाच वर्षात दूध उत्पादनात 6.4 टक्के दराने वाढ होत असून 2014-15 मधल्या 146.3 दशलक्ष मेट्रिक टनावरुन 2018-19 मध्ये हे उत्पादन 187.7 दशलक्ष मेट्रिक टन झाले आहे. दूध उत्पादनापैकी 54 टक्के दूध बाजारात विकण्यासाठी उपलब्ध असून 46 टक्के स्थानिक गरजांसाठी खेड्यांमध्ये राखले जाते.
शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या विपणन योग्य दुधापैकी केवळ 36 टक्के दूध संघटित क्षेत्राकडून, सहकारी आणि खाजगी क्षेत्रांना समसमान विकले जाते. उर्वरित 64 टक्के अतिरिक्त दुधही संघटित क्षेत्राअंतर्गत आणण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षात सहकारी क्षेत्रात दुध खरेदीत 9 टक्के वाढ झाली आहे.
पशूपालन आणि दुग्धविकास विभाग दुध उत्पादकता वाढविण्यासाठी सातत्याने काम करत आहे. आनुवंशिक सुधारणा करुन उत्पादकता वाढविण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी हा विभाग प्रयत्नशील आहे. दुधाचा दर्जा उंचावण्यासाठीही नुकताच विशेष कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. सहकारी आणि खाजगी क्षेत्रासाठीही वित्तीय भागीदारीतून या कार्यक्रमाला गती देण्याचा प्रस्ताव आहे.
उत्तम उत्पादकता, उत्पादन खर्चात घट, दुधाचा आणि दुग्ध उत्पादनांचा उत्तम दर्जा यामुळे दुग्ध क्षेत्रात स्पर्धात्मकता निर्माण होईल आणि नफा वाढेल यातून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाढ होईल. यातून या क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढेल आणि ग्रामीण उत्पन्न आणि रोजगारालाही चालना मिळेल.
Share your comments