राज्यातील दुधाच्या दरात मोठी घसरण झाली असून राज्यातील दुध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज 5 डिसेंबर रोजी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयासमोर दुधाला किमान 34 रुपयांचा दर मिळावा या मागणीसाठी किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने तीव्र आंदोलन केले. सरकारने जर दुध प्रश्नी तोडगा काढला नाहीतर मंत्रालयात दूध ओतावं लागेल असा इशारा किसान सभेने दिला.
दुधाचे पाडले जाऊ नये यासाठी दुग्धविकास मंत्र्यांनी पुढाकार घेवुन एक समिती गठित केलेली होती. यामध्ये खाजगी आणि सहकारी दूध संघांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या समितीने 35 रुपये दर दिला जाईल अशा प्रकारची घोषणा केली होती. मात्र तरीही दुधाचा भाव 27 रुपयांपर्यंत आले आहेत. त्यामुळे दुग्धविकास मंत्री आणि दुग्धविकास विभागाने या सगळ्या बाबतींमध्ये हस्तक्षेप करावा असे आवाहन अजित नवले यांनी करत किमान 35 रुपये शेतकऱ्यांना दुधाचा दर द्यावा अशी मागणीही त्यांनी केली होती.
मात्र अजुनही दुधाला योग्य भाव न मिळाल्याने दुध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून ठिकठिकाणी दूध दरासाठी आंदोलने केली जात आहेत. तसेच राज्यभर दुधाचे भाव कोसळल्यामुळे आणि पशुखाद्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा या मागणीसाठी आज किसान सभा आणि दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयासमोर दुध ओतून तीव्र आंदोलन केले. सरकारने दाद दिली नाही तर मंत्रालयात दुध ओतावे लागेल असा इशारा यावेळी किसान सभेचे राज्य सहसचिव सदाशिव साबळे यांनी दिला. संगमनेर सोबतच पुणे जिल्ह्यातही दुध ओतून तीव्र आंदोलन करण्यात आले आहे.
Share your comments