राज्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, मका, द्राक्षबागा यांसह इतर हाताशी आलेली पिके पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. असं ट्विट करत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, वाशिम, नाशिक, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं आहे. फळबागा, पोल्ट्री फार्म, शेततळे, वाहने, शेड, तसेच घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच अजून पुढील काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांसह गारपीटीच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पिकांचे अजुन नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे असा धीर धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे -
राज्यातील सुमारे 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने हजारो हेक्टर शेती बाधित झाली असल्याचे वृत्त आहे; तसेच आणखी पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या अवकाळी व गारपीटीने रब्बीतील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
कृषी, मदत व पुनर्वसन आणि महसूल विभागाच्या वतीने झालेला पाऊस व त्यामुळे झालेले नुकसान याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची शासनाची भूमिका आहे.
Share your comments