1. बातम्या

दूध उत्पादकांना जास्त दर मिळावा यासाठी सरकार सकारात्मक

मिल्कोमीटर व वजनमापाच्या त्रुटीबद्दल वजनमापे विभागाला तत्काळ निर्णय घेण्याबाबत सूचित करण्यात येईल. दुधाची गुणप्रत ठरविताना 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ वरुन 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ करण्यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्यात येतील, दूध पावडर निर्यातीबद्दल केंद्र शासनाशी संपर्क करुन विनंती करण्यात येईल.

Milk Issue News

Milk Issue News

मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी शासन सकारात्मक असून, यापूर्वी विभागाने प्रयत्न केलेले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्यातील प्रमुख सहकारी व खासगी दूध संघांनी पुढाकार घेण्याचे आवाहन महसूल, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राज्यातील दूध उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या. (महानंद) मुंबईचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील आणि रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त अजित पवार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ विभागीय प्रमुख आणि राज्यातील प्रमुख सहकारी व खासगी दूध संघाचे प्रतिनिधी, पशुखाद्य उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सध्या दुधातील भेसळ रोखण्यासाठी ही प्रयत्न केला जात आहे. दुधातील भेसळ रोखण्यात यश आले, तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्त भाव देणे शक्य होणार आहे. दुधाची गुणवत्ता टिकविणे अत्यंत आवश्यक आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय समिती गठित करण्यात येत असून, त्यांच्यामार्फत तपासणीअंती दूध भेसळ करणाऱ्यांवर तसेच भेसळयुक्त दूध घेणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मिल्कोमीटर व वजनमापाच्या त्रुटीबद्दल वजनमापे विभागाला तत्काळ निर्णय घेण्याबाबत सूचित करण्यात येईल. दुधाची गुणप्रत ठरविताना 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ वरुन 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ करण्यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्यात येतील, दूध पावडर निर्यातीबद्दल केंद्र शासनाशी संपर्क करुन विनंती करण्यात येईल. पशुधनास गुणवत्तापूर्ण पशुखाद्य किफायतशीर दरात उपलब्ध होण्यासाठी आयुक्त, पशुसंवर्धन यांचे अध्यक्षतेखाली सर्व समावेशक पशुखाद्य गुणवत्ता व दर समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे, असेही मंत्री श्रविखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी राज्यातील प्रमुख सहकारी व खासगी दूध संघाचे प्रतिनिधी आणि प्रमुख पशुखाद्य उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधींनी दूध व्यवसाय संबंधित असलेल्या अडचणी सांगितल्या. या अडचणी संबंधित विषय मंत्रिमंडळात चर्चा करुन यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

English Summary: Government positive for milk producers to get higher rates Published on: 22 November 2023, 10:33 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters