मुंबई: मराठवाड्यात सातत्याने पडणारा दुष्काळ पाहता मराठवाडा वॉटरग्रीड ही योजना महत्त्वपूर्ण आहे. कुठल्याही योजनेचे परिणाम दूरगामी व लोकांच्या फायद्यासाठी असल्यास शासन त्यासंदर्भात सकारात्मक आहे. त्यामुळे मराठवाडा वॉटरग्रीडसंदर्भात शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.
उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात वॅाटरग्रीड योजनेची कामे पूर्ण करण्याविषयीचा प्रश्न सदस्य राणा जगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. मराठवाडा वॉटरग्रीडसंदर्भात मराठवाड्यातील आमदारांची अलीकडेच बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठवाडा वॉटरग्रीडसंदर्भात चर्चा करण्यात आली. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर वीज लागणार आहे. त्यामुळे त्याचेही नियोजन यासंदर्भात करावे लागणार आहे.
परतूरमध्ये या योजनेचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याचे श्री. पवार यांनी यावेळी सांगितले. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या पाणी ग्रीड प्रकल्पाच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदेची कार्यवाही सुरू असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनीही या प्रश्नाच्या वेळी उत्तर देताना सांगितले.
Share your comments