Cataract Free News
मुंबई : नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्यविषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता टाळण्यासाठी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वी करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. शासनाचे हे मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या संस्थेने सर्वतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता आणि त्यावर उपाययोजना म्हणून २०१७ पासून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन सुरू आहे. शासनाने हाती घेतलेल्या या मिशनची २०१८ मध्ये नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. येत्या २०२७ पर्यंत हे मिशन यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टिने विदर्भात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) ही संस्था इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (आयजीएमसी), नागपूर यांना मदत करत आहे. डब्ल्युसीएल या संस्थेच्या माध्यमातून आयजीएमसी, नागपूर यांनी गेल्या वर्षभरात साधारण चार हजार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रीया केल्या आहेत. तसेच शासनासोबत केलेल्या कराराच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन स्वप्नपूर्तीसाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने संपूर्ण विदर्भात विविध उपक्रम राबवून यापुढील तीन वर्षात दरवर्षी साधारण चार हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी देखील ही संस्था सहकार्य करणार आहे.
ही संस्था विदर्भातील ग्रामीण भागामध्ये शिबीर घेऊन ज्यांना मोतीबिंदू आहे त्या रुग्णाचे निदान करून त्यांना रुग्णालयामध्ये पोहोचवून त्यांच्यावर मोफत उपचार करतील. तसेच या मार्फत रुग्णालयांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतील. डब्ल्यूसीएल संस्थेचे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशनच्या यशस्वीतेसाठी शासनाला असलेले सहकार्य पाहून इतर स्वयंसेवी संस्था देखील या कामात पुढाकार घेतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
Share your comments