पुणे : देशात यंदा सर्वात जास्त खरीपाखालील क्षेत्राची नोंदणी झाली असून , चांगल्या पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम सर्वाधिक उत्पादन देणारा ठरणार आहे. कोरोना आणि मोठया प्रमाणात उदभवलेली पूर परिस्थितीत देखील रेकॉर्डब्रेक उत्पादन होण्याची आशा निर्माण झाली आहे. घटलेल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी देशाला दिलासा देणारी ठरणार आहे. देशात २९ ऑगस्ट २०२० च्या रोजी १०८२ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. हेच प्रमाण मागच्या वर्षी १०१० लाख हेक्टर होते. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये हे प्रमाण ७० लाख हेक्कटरने अधिक आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये खरिपाचा पेरा १०६६ लाख हेक्टर राहिला होता. सन २०१६ चा खरिपाचा पेरा हा सर्वाधिक १०७५ लाख हेक्टर होता.
सरकारी आकडेवारीनुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खरिपाच्या पीक क्षेत्रामध्ये ७% वाढ झालेली आहे. तसेच हे वाढलेले क्षेत्र हे भात,डाळी, आणि तेलंबियामुळे वाढलेले आहे. काही दिवसांपूर्वी, सोयाबीन उत्पादक संघटनेने सोयाबीनचे पीक यावर्षी वाढणार असल्याचे सरकारला सांगितले होते आणि तेलाच्या वाढीव आयातीला निर्बंध घालण्याची मागणी केली होती.
दरम्यान राज्यातील खरीप पिकांची स्थिती अतिशय आशादायक आहे. हंगाम चांगला झाल्यास बाजार समित्यांमध्ये दरवर्षी होणारी अंदाजे ४५ ते ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल या खरीपामध्ये ५५ हजार कोटींच्या पुढे पोहचू शकते. तथापि काढणीपर्यंत निसर्गाने साथ देणे अपेक्षित आहे, असे मत पणन विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केले. राज्यात ऑगस्ट मध्यपर्यंत २२७ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. समाधानाकारक पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली आहे.
खरिपात कापूस, सोयाबीन, तूर, भात आणि मका ही प्रमुख पिके सजमली जातात. कपाशीचा पेरा साधरण ४१.५७ लाख हेक्टरवर होतो. सध्या हाच पेरा ४२ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. गेल्या हंगामात हाच पेरा ४२.६८ लाख हेक्टरच्या पुढे झाला होता. कपाशीचा पेरा सध्या सरासरी क्षेत्राच्या १०१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
Share your comments