अत्यंत कमी पाण्यावर हमखास उत्पादन देणारी शेती म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. मराठवाड्यात बीड, औरंगाबाद तसेच जालना आणि परभणी हे जिल्हे यात आघाडीवर आहेत. मराठवाड्यातील पहिले अंडीपुंज केंद्र हे औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाणा येथे होत असून, ते मराठवाड्यासाठी वरदान ठरणार आहे.
महाराष्ट्रात रेशीम शेतीचा प्रारंभ जवळपास पाच दशकांपूर्वी झाला. आजघडीला जवळपास २८ जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणावर रेशीम शेती केली जाते. लहानात लहान शेतकरीदेखील ही शेती अत्यंत कमी पाण्यावर करता येत असल्याने त्याकडे वळला आहे. मध्यंतरी मराठवाड्यातही या रेशीम शेतीसाठी वस्त्र उद्योग विभागाने पुढाकार घेतला होता. नंतर या शेतीचे महत्त्व विशेषकरून ग्रामीण भागातील महिलांना कळल्याने त्या या शेतीकडे वळल्या आहेत. रेशीम निर्मितीसाठी तुतीची लागवड करून त्यातून निघणाऱ्या अळींचे संगोपन तसेच त्यांचे सरंक्षण हे सोप्या पद्धतीने केले जाते.
केवळ तापमान वाढीचा आणि कमी होण्याचे तंत्र सांभाळल्यास ही शेती परवडणारी असून, जालना जिल्ह्यात ही शेती जवळपास ९०० एकरपेक्षा अधिक आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यात ही शेती एक हजार ३०० एकरांवर केली जाते. बीड जिल्हा आजघडीला मराठवाड्यात अव्वल असून, तेथे दोन हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रात ही शेती केली जात असल्याची माहिती उपसंचालक प्रादेशिक रेशीम विकास यंत्रणेचे डी. ए. हागे यांनी दिली.
जालन्यात देशातील दुसरे कोष
खरेदी केंद्रमहाराष्ट्रातील रेशीम कोष निर्मितीनंतर ते कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना आधी कर्नाटक राज्यातील रामनगर येथे जावे लागत होते; परंतु तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, तत्कालीन वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खेातकर यांनी पुढाकार घेऊन जालन्यातील कृषी बाजार समितीत महाराष्ट्रातील पहिले रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू केले. येथे आज या रेशीम कोषाला चांगला भाव मिळत असून, ३७६ रुपये प्रती किलाेने आज कोषाची खरेदी येथे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्नाटकला जाण्यासाठीचा मोठा वेळ आणि पैसा वाचला आहे. लवकरच जालन्यात या रेशीम कोष खरेदीसाठी सहा कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
अंडीपुंज केंद्र वरदान ठरणारराज्याच्या अर्थसंकल्पात सोमवारी चिकलठाणा येथे अंडीपुंज केंद्र अर्थात ग्रेनेज मंजूर केले आहे. त्यासाठी २१ कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. येथे यासाठी कोल्डस्टोरेज-शीतगृह उभारण्यात येणार असून, तेथे अंडी उबविली जाणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण तज्ज्ञांकडून देण्याची व्यवस्थाही येथे होणार असल्याने हे अंडीपुंज केंद्र मराठवाडा विभागासाठी वरदान ठरणार आहे.
Share your comments