राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जात असलेल्या गायीच्या दूध दरात वाढ झाली आहे. डेअरीचालकांनी प्रतिलिटरल सरासरी दोन रुपयांची वाढ केली आहे. कोरोनामुळे दुधाच्या दरात घसरण होत होत असल्याने दूध उत्पादक अडचणीत सापडले होते. पण सध्याच्या दरवाढीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी खासगी सोनई डेअरीने शेतकऱ्यांना एक जानेवारीपासून गायीच्या २४ रुपयांऐवजी प्रतिलिटर २६ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. यासह वाहतूक व कमिशनसहीत हा दर २७.५० रुपये राहील असे सोनईचे अध्यक्ष दशरथ माने यांनी सांगितले.
देशांतर्गत बाजारात दूध भुकटीचे आणि लोण्याचे दर वाढल्यामुळे दुधाची खरेदी करण्यासाठी अतिशय पुरक स्थिती डेअरी उद्योगात तयार झाली आहे. एसएमपीचे दर आता प्रतिकिलो १६० रुपयांवरुन २०० रुपयांच्या पुढे आणि लोण्याचे दर देखील देशांतर्गत बाजारात २३० रुपयांवरुन २९० रुपयांपर्यत झालेले आहेत.यामुळे डेअरी उद्योगांमधील पावडरचे साठे निकाली निघण्यास मदत होते आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या दुधाला देखील दरवाढ मिळण्यात हातभार लागत आहे.महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी एका माध्यमाला सांगितले की, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने शेतकऱ्यांना बदलत्या बाजारपेठेचा लाभ तातडीने देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने दर वाढविलेले नसले तरी कात्रज ने पुढाकार घेत गायीच्या दुधाला प्रतिलिटर एक रुपया तर म्हैशीच्या दुधाला खरेदीकार दोन रुपयांनी वाढविले आहेत.
दरम्यान कोविडच्या काळात राज्यातील डेअरी उद्योगांनी टँकरमधून येणाऱ्या दुधाचे कमी केले होते. त्यामुळे खासगी संकलक देखील गावपातळीवर शेतकऱ्यांना कमी दर देत दुधाची खरेदी करत होते. गेल्या महिन्यात २४ -२५ रुपये दराने टँकरमधील दूध खरेदी केले जात होते. आता हे दर २८ रुपयांपर्यंत आणले गेले आहे. एक जानेवारीपासून पावडर प्लांटचालक हाच दर काही ठिकाणी २९ रुपये देणार आहेत. यामुळे ही पोषक स्थिती शेतकऱ्यांच्याही पथ्यावर पडणारी आहे, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.
Share your comments