राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers) कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे.
2016 मध्ये अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेणा-या राज्यातील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भूविकास बँक म्हणजे एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली बँक. या बँकेकडून शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज मिळत असे. भूविकास बँकेची स्थापना 1935 मध्ये झाली.1997 पासून बँक आर्थिक अडचणीत आली. कर्जवाटप थांबल्याने ‘नाबार्ड’ने अर्थपुरवठा बंद केला. जानेवारी 2016 पासून जिल्हानिहाय बँका अवसायनात काढण्यात आल्या.
अखेर 86 वर्षं सुरू असलेला बँकेचा प्रवास थांबला. पण भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार असल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत.
Share your comments